खरीप कांद्याचे दिले ऑनलाईन प्रशिक्षण; कांद्याला दर अधिक, लागवडक्षेत्र वाढले

रिसोड जिल्ह्यामध्ये खरीप व लेट खरीप कांदा लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरीप हंगामातील कांद्याला बाजारात अधिक दर मिळतो व इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न येते.

    रिसोड (Resode).  जिल्ह्यामध्ये खरीप व लेट खरीप कांदा लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खरीप हंगामातील कांद्याला बाजारात अधिक दर मिळतो व इतर पिकांच्या तुलनेत चांगले उत्पन्न येते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना खरीप कांदा पीक उत्पादनाविषयी कृषी विज्ञान केंद्र वाशीमच्या वतीने खरीप कांदा-रोपवाटिका व्यवस्थापन व लागवड तंत्रज्ञान या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, वाशीमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या निवृत्ती पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी तांत्रिक मार्गदर्शन करताना निवृत्ती पाटील यांनी कांदा हे भारतीय आहारातील महत्त्वाचे पिक असल्याचे सांगितले. इतर देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता कमी असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची उत्पादकता सुद्धा कमी आहे. त्यामागील कारणे व संभाव्य उपाय या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

    खरिप हंगामातील कांदा लागवडीतील बारकावे विषद करताना योग्य जमिनीची निवड, योग्य व शिफारशीत वाणांचा वापर, बीज प्रक्रिया व रोप वाटिका व्यवस्थापन, अन्नद्रव्य व ओळीत व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली. कांदा रोपवाटिका यशस्वी झाली म्हणजे अर्धीअधिक लढाई जिकली असा समज होतो.त्याकरिता मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य मात्रेत वापर करावा. 13 मी व 15 सेमी उंचीचे गादी वाफे तयार करून सावलीसाठी 60 टक्के सावलीसाठी नेटचा वापर करावा,अशी माहिती दिली. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ.रवींद्र काळे यांनी शेतक-यांनी बहुपिक पद्धतीचा अवलंब करून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यादृष्टीने अधिक बाजार भाव व जास्त नफा मिळविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने खरिप हंगामात कांदा उत्पादन घ्यावे,असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.