प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नुकत्याच झालेल्या गारांच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नावर घाला घातला आहे. जिल्ह्यातील तब्बल 6 हजार 697 शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पालापाचोळा झाला आहे. जिल्ह्यात झालेल्या गारपिटीने 4 हजार 880 हेक्टर 19 आर क्षेत्रावरील पिके भूईसपाट झाली आहेत.

  रमेश उंडाळ
  वाशीम (Washim).  नुकत्याच झालेल्या गारांच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नावर घाला घातला आहे. जिल्ह्यातील तब्बल 6 हजार 697 शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पालापाचोळा झाला आहे. जिल्ह्यात झालेल्या गारपिटीने 4 हजार 880 हेक्टर 19 आर क्षेत्रावरील पिके भूईसपाट झाली आहेत. नुकसान भरपाई कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून नैसर्गिक संकटाने शेतीची दाणादाण उडविली आहे. अवकाळी पावसाच्या धारा, वादळीवारा आणि गारांचा मारा यामुळे जिल्ह्यातील हरभरा, गहू, कांदा, संत्रा, टोमॅटो, निंबू यासह फळबांगा क्षणात उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून पिकांच्या सभोवताल राहणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे. जिल्ह्यात 19 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 4 हजार 880 हेक्टर 19 आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर 6 हजार 697 शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. जिल्ह्यात 19 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने व गारांनी जिल्ह्यात 4 हजार 880 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

  तालुकानिहाय नुकसान
  वाशीम जिल्ह्यातील तालुक्यात 1 हजार 693 हेक्टर 29 आर जमिनीवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 2123 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

  मालेगाव : तालुक्यात गहू, हरभरा, मूग, ज्वारी, भाजीपाला, टरबूज, शेगवा, पपई व सोयाबीन या पिकांचे 1 हजार 132 हेक्टर 90 आर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये 1800 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

  रिसोड : तालुक्यात 1 हजार 476 हेक्टर 70 आर जमिनीवरील कांदा, पपई, उन्हाळी मूग, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 1810 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

  मंगरूळपीर : तालुक्यातील 46 हेक्टर 30 आर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे.यामध्ये 96 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

  मानोरा : तालुक्यातील 531 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये 865 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

  अहवाल विभागीय आयुक्तांकडे
  19 मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारांमुळे जिल्ह्यातील 20 मंडळात झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने अमरावती विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविला आहे. त्यामध्ये वाशीम तालुक्यातील वाशीम, कोंडाळा झामरे, नागठाणा, पार्डी असरा, पार्डी टकमोर, अनसिंग या मंडळाचा समावेश आहे. तर मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा,मुंगळा,करंजी,चांडस व शिरपूर या मंडळाचा समावेश आहे.रिसोड तालुक्यातील केनवड, गोवधर्नन या मंडळाचा समावेश आहे. मंगरुळपीर तालुक्यातील एकमेव आसेगाव या मंडळाचा समावेश आहे. तर, मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, कुपटा, शेंदूरजना, गिरोली व उमरी बु.या मंडळाचा समावेश आहे.