खराब रस्त्याच्या बांधकामासाठी दिलेल्या लेखी पत्राकडे दुर्लक्ष; नागरिकांना सहन करावा लागतोय मनस्ताप

रिसोड शहरातील महत्त्वाच्या रस्त्याचे काम शासनाने 15 मार्चपर्यंत सुरू करण्याचे लेखी पत्र काढूनही काम सुरू होण्यासाठी प्रशासकीय हालचाल दिसत नाही. युवा सामाजिक कार्यकर्ता अनंता देशमुख यांनी या रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण केले होते.

    रिसोड (Resode).  शहरातील महत्त्वाच्या रस्त्याचे काम शासनाने 15 मार्चपर्यंत सुरू करण्याचे लेखी पत्र काढूनही काम सुरू होण्यासाठी प्रशासकीय हालचाल दिसत नाही. युवा सामाजिक कार्यकर्ता अनंता देशमुख यांनी या रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण केले होते. त्यानंतरही केवळ टोलवाटोलवी कायम आहे.

    त्यांच्या उपोषणाची सांगता अधीक्षक अभियंता कळमकर यांच्या 15 मार्च पर्यंत काम सुरू करण्याच्या लेखी पत्राच्या आधारे झाली होती. 23 मार्च आला तरी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. अनंता देशमुख हे सातत्याने या रस्त्यासाठी रिसोडकरांच्या वतीने पाठपुरावा करीत आहेत. रिसोड शहरातील नागरिकांनी मागील पाच वर्षापासून या रस्त्यासाठी संघर्ष केला आहे. परंतु शासनाच्या वेळकाढू व भ्रष्ट धोरणामुळे हा संघर्ष व्यर्थ जातो की काय? अशी परिस्थिती आहे. हिंगोली नाका ते कालुशा बाबा दर्गापर्यंत केवळ एक किलोमीटर लांबीचा रस्ता करायला रिसोडकरांना पाच वर्षे संघर्ष करावा लागतो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एक किलोमीटरचा रस्ता राजकारणातील नेतृत्वाकडून केवळ जनतेची राजकीय सहानुभूती मिळविण्यासाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट होते आहे.

    या रस्त्यावर बसस्थानक, वाणी समाज स्मशान भूमी, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय, सहकारी पेट्रोल पंप, बगडिया महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री शिवाजी विद्यालय, मंगलमूर्ती विद्यालय, पंचायत समिती, एटीएम, ऋषींवट बँक, वाशीम अर्बन बँक, जनता बँक, दलाल कापड दुकान, पाटील झेरॉक्स, पुष्पांजली ड्रेसेस, सम्राट कापड दुकान, ब्रह्मा कुमारीज ओम शांती केंद्र, अलाहाबाद बँक, बुलढाणा अर्बन बँक, पोलिस स्टेशन इत्यादी शासकीय कार्यालये तथा प्रसिद्ध प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नियमित वर्दळ असते. एवढ्या महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम प्रशासन वेळेवर का पूर्ण करीत नाही आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या रस्त्याचे काम करण्यासाठी प्रशासनाला भाग का पाडत नाहीत हा प्रश्न शहरवासीयांना कायम सतावत आहे.