ऑक्सिजन प्लँट तातडीने उभारा; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

वाशीम राज्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेवून ‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी...

  वाशिम (Washim).  राज्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेवून ‘ब्रेक दि चेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच लिक्विड ऑक्सिजन प्लँट उभारण्याच्या कामाला गती द्यावी,अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यातील कोरोना आढावा सभेत ते बोलत होते.

  यावेळी विविध विभागांच्या अधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री देसाई यांनी नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर लक्षात घेवून जिल्ह्यात आणखी कोविड केअर सेंटर व इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करावे. कोरोना बाधितांवर उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही,याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात लिक्विड ऑक्सिजन प्लँट उभारण्याची कार्यवाही गतिमान करावी.

  जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत सर्व ठिकाणी पुरेसा औषधी साठा उपलब्ध ठेवावा,अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. ग्रामीण भागामध्ये लसीकरणाविषयी जनजागृतीवर भर देवून लोकांना लसीकरणाची माहिती द्यावी. या जनजागृतीमध्ये शिक्षकांची मदत घ्यावी,अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

  .शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली असून तेथे केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार कार्यवाही सुरु आहे.जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या,ग्रामीण भागातील कोरोना चाचण्या तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेवून कोरोना लसीकरणाविषयी जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  १३ हजार ६०० चाचण्या
  जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून गेल्या सात दिवसांत 13 हजार 600 कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती दिली. सद्यस्थितीत प्रत्येक बाधिताच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा शोध घेवून त्यांची चाचणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना बाधितांवर उपचारासाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत.ऑक्सिजन सुविधा असलेल्या 371 खाटा उपलब्ध असून सध्या 94 रुग्ण उपचार घेत आहेत.तसेच व्हेंटीलेटर सुविधा असलेल्या 44 खाटा उपलब्ध असून 7 रुग्ण उपचार घेत आहेत.