ऑक्सिजन प्लांटला पीएम केअरचा निधी; आमदार राजेंद्र पाटणी यांची माहिती

लेडी हार्डिंग्ज कोविड केअर सेंटरच्या परिसरात पीएम केअर निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. या प्लांटमुळे जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागण्यास मदत होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांनी दिली.

    वाशिम (Washim).  लेडी हार्डिंग्ज कोविड केअर सेंटरच्या परिसरात पीएम केअर निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. या प्लांटमुळे जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागण्यास मदत होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांनी दिली.

    गतवर्षी देशात पहिल्यांदाच कोरोनाची लाट आली होती. सदर महामारीतून देशाला वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन सुरू केले. सोबतच देशात आरोग्य यंत्रणेचे अपग्रेडेशन व गरजवंतांना मदत करता यावी यासाठी पीएम केअर मध्ये योगदान देण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनाला देशातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

    पीएम केअरमध्ये जमा झालेल्या निधीतून व्हेंटिलेटर, आरोग्य यंत्रणेचे अत्याधुनिककरण, ऑक्सिजन निर्मिती प्लांट आदि सुविधा निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानुसार महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभे करण्याला केंद्राने निधी मंजूर केला. यामध्ये वाशीम जिल्ह्याचाही समावेश होता. सद्या सदर प्लांटच्या कामाबाबत आपण जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सतत संपर्कात असून काम प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असल्याचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी यावेळी सांगितले.

    वाशीम आकांक्षित जिल्हा असल्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा सुदृढ करणे महत्त्वाचे आहे. येथील ऑक्सिजनची गरज पाहता ऑक्सिजन निर्मिती प्लांट वाशिमला उभारावा यासाठी आ.राजेंद्र पाटणी यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.

    पीएम केअरमध्ये वाशिमचे योगदान
    देशवासियांना पीएम केअरमध्ये योगदान देण्याचे आवाहन केल्यानंतर वाशीम जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात राशी जमा केली होती. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा वाटा यामध्ये अधिक होता. पीएम केअरमध्ये योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये वाशीमचा समावेश होता. त्यामुळेही ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी केंद्राने वाशीमला प्राधान्य दिले.