कैद्यांचे झाले मनपरिवर्तन, घेतली कोरोना लस; सामाजिक कार्यकर्ते व तुरुंग प्रशासनाच्या प्रयत्नाला यश

संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनापासून संरक्षणाकरिता संपूर्ण सुरक्षित असलेली कोविशिल्ड लस केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना दिल्या जात आहे.

    वाशिम (Washim).  संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनापासून संरक्षणाकरिता संपूर्ण सुरक्षित असलेली कोविशिल्ड लस केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना दिल्या जात आहे. स्थानिक जिल्हा कारागृहातही जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कारागृह अधिक्षक सोमनाथ पाडुळे यांच्या नेतृत्वात कोरोना लस कारागृहातील कैद्यांना देण्यात आली. मात्र,त्यामध्ये जवळपास 15 ते 20 कैद्यांनी ही लस न घेण्याचा निर्णय घेतला.

    सदर लस ही बंधनकारक नसून स्वेच्छेने देण्याचे शासनाचे आदेश असल्याने त्या कैद्यांना लस देण्यात आली नाही. प्रशासनाच्या पुढाकाराने कैद्यांमध्ये कोरोना लसीबाबत असलेली शंकाकुशंका दूर व्हावी,यासाठी 4 एप्रिल रोजी बालरोगतज्ञ डॉ.हरिष बाहेती,सामाजिक कार्यकर्ते व मोटीवेशनल स्पीकर निलेश सोमाणी व आयुर्वेद तज्ञ डॉ.सुविधा सोमाणी यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यानंतर त्या कैद्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांनी लस घेतली आहे.

    स्थानिक जिल्हा कारागृह सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृह अधिक्षक सोमनाथ पाडुळे होते. मंचावर वक्ते म्हणून डॉ. हरिष बाहेती, निलेश सोमाणी, डॉ. सुविधा सोमाणी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी बी.एन.राऊत, मिश्रक रंजीत पवार, कॉस्टेबल मुरलीधर ठाकरे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ.हरिष बाहेती व डॉ.सुविधा सोमाणी यांनी कोरोना लसीचे महत्व विषद करुन ही लस सुरक्षीत असल्याचे व त्याचे महत्व विषद केले. सोमाणी यांनी आपल्या संभाषणातून विविध दाखले व उदाहरणासह कैद्यांचे प्रबोधन केले.

    कोरोना लस ही पुर्णत: सुरक्षीत असून यामुळे आपल्यासह कुटुंबियांचे रक्षण होत असल्याचे सांगितले.मनातील शंका व गैरसमज याला दूर ठेवून प्रत्येकांनी लस घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी कैद्यांचे मनपरिवर्तन झाले व त्यांनी तत्काळ कोरोना लस घेण्याचे जाहीर केले. तत्काळ जिल्हा कारागृह अधिक्षक पाडुळे यांच्या मार्गदर्शनात संबंधित कैद्यांना कोरोनाची लस देण्यात आली.

    सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने व प्रबोधनाने कारागृहातील कैद्यांचे मनपरिवर्तन होवून त्यांनी आपले सामाजिक दायित्व व कर्तव्य पार पाडले. प्रशासनापुढे निर्माण झालेली समस्याही यामुळे निराकरण झाली. पाडुळे यांनी सर्व मार्गदर्शक वक्त्यांचे आभार मानले.