शिरपूर- वाशिम रस्त्याची थातूरमातूर डागडुजी; रस्त्यावरील गिट्टी काही दिवसातच उखडली

शिरपूर ते वाशीम हा वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावरून सतत वाहनांची ये-जा सुरू असते. शिरपूरपासून जिल्ह्याला जोडणारा अवघ्या वीस किलोमीटरचा रस्ता खड्ड्यात गेला आहे.

    शिरपूर जैन (Shirpur Jain).  शिरपूर ते वाशिम हा वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावरून सतत वाहनांची ये-जा सुरू असते. शिरपूरपासून जिल्ह्याला जोडणारा अवघ्या वीस किलोमीटरचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. त्याची डागडुजी यापूर्वी देखील करण्यात आली होती.मात्र,या रस्त्यावरील गिट्टी काही दिवसातच उखडून गेली आहे.त्यामुळे रस्ता पूर्वीप्रमाणेच जैसे थे झाला आहे.

    आता पुन्हा या रस्त्याची थातुरमातुर डागडुजी करण्यात आली असून, डागडुजीची गिट्टी रस्त्यावर पसरली असल्याने दुचाकी धारकांचे अपघात घडत आहेत. तसेच वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    शिरपूर ते वाशीम हा रस्ता जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास सोयीचा असून या रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी, दैनंदिन चालणा-या दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने या रस्त्यावरून सतत ये-जा करतात.या अवघ्या 20 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था मोठी दयनीय झाली आहे.दुचाकी वाहन चालवताना मोठी कसरत करत व जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून चालावे लागते.तसेच संपूर्ण रस्ता खड्डेमय झाल्याने रस्त्यात खड्डे आहेत की,खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही.सदर रस्त्यासाठी लोकप्रतिनिधीनी निधी मंजूर करण्यात आला आहे.मात्र,अद्याप त्यानुसार कसल्याही प्रकारचे काम सुरू झाल्याचे दिसत नाही.गतवर्षी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती.मात्र,अवघ्या पंधरा-वीस दिवसातच गिट्टी उखडून गेली.

    अनेक दिवस हा रस्ता खड्ड्यातच होता.त्यात आता रस्त्याची पुन्हा थातूरमातूर डागडुजी करण्यात आली.या डागडुजीमुळे त्यावर टाकलेली बारीक गिट्टी वाहनाच्या वर्दळीने निघून रस्त्यावर पसरत आहे.त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. याची कुठे डागडुजी केली तर,कुठे सोडून दिली आहे.सदर रस्ता हा नेहमीच वर्दळीचा असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण व संपूर्णतः डांबरीकरण होणे गरजेचे आहे.मात्र,त्यावर थातूरमातुर डागडुजी करून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता चांगला केल्याचे निदर्शनास आणून दिले जाते.डागडुजी करताना पुरेपूर डांबर वापरून निदान व्यवस्थित खड्डे बुजवण्यात यावेत व संपूर्ण रस्ताच पुन्हा डांबरीकरण करावा,अशी मागणी नागरिक करीत आहेत.