रविवारी एमपीएससी परीक्षा; वाशिम जिल्ह्यातील ६ हजार ७४४ उमेदवार तयारीत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित पूर्वपरीक्षा रविवारी, 11 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येणार आहे. वाशीम शहरातील 15 व मंगरूळपीर शहरातील 6 अशा जिल्ह्यातील एकूण 21 परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

    वाशिम (Washim).  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित पूर्वपरीक्षा रविवारी, 11 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येणार आहे. वाशिम शहरातील 15 व मंगरूळपीर शहरातील 6 अशा जिल्ह्यातील एकूण 21 परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातून 6744 परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.

    यामध्ये वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, माउंट कारमेल इंग्लिश स्कूल, शिवाजी विद्यालय, तुळशीराम जाधव महाविद्यालय, सन्मती इंजिनिअरिंग कॉलेज, एसएमसी इंग्लिश स्कूल, हॅपी फेसेस हायस्कूल, बाकलीवाल विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, रेखाताई कन्या शाळा, शासकीय तंत्र निकेतन, मातोश्री शांताबाई गोटे कॉलेज, मालतीबाई सरनाईक कन्या शाळा, सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय यासह मंगरूळपीर शहरातील यशवंतराव चव्हाण कॉलेज, जिल्हापरिषद हायस्कूल, यशवंतराव चव्हाण विद्यालय, कलंदरिया उर्दू हायस्कूल, यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय या 21 उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

    ‘या’ ओळखपत्रावर मिळणार प्रवेश
    परीक्षेला जाताना या ओळखपत्रावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामध्ये आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही दोन मूळ ओळखपत्र व त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत असणे आवश्यक आहे. ती स्वतःच्या स्वाक्षरीसह समवेक्षकाकडे जमा करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळा शाईचा पॉईंट पेन, मूळ ओळखपत्र व त्याची रंगीत छायांकित दोन प्रत सोबत आणावे लागणार आहे. उमेदवारांना एकदा परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत केंद्राबाहेर जाता येणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी पाण्याची बाटली सोबत ठेवावी.