टपाल कार्यालयाला तीन दिवसांपासून कुलूप; नागरिक त्रस्त

मंगरूळपीर टपाल कार्यालयाअंतर्गत मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे भारतीय ग्रामीण डाकघर कार्यान्वित आहे.

    मानोरा/ वाशीम. तालुक्यातील फुलउमरी येथील टपाल कार्यालय गेल्या तीन दिवसांपासून कुलूपबंद आहे. यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने हा गुंता सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

    मंगरूळपीर टपाल कार्यालयाअंतर्गत मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे भारतीय ग्रामीण डाकघर कार्यान्वित आहे. पोस्टमास्टर शिवलाल राठोड यांनी चांगली सेवा दिली. मात्र, अलीकडे राठोड यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक पोस्टमास्तर म्हणून झाली. काही काळ त्यांनी चांगली सेवा दिली. सध्या सकाळी आठ ते बारा टपाल कार्यालय                  उघडे ठेवणे आवश्यक आहे.

    मात्र नऊ वाजल्यानंतरच कार्यालय उघडून अकरा वाजता बंद केले जाते. आता तर गेल्या तीन दिवसांपासून टपाल कार्यालय कुलूप बंद आहे. मंगरुळपीर येथील पोस्टमास्तरांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता फुलउमरी येथील खराटे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्या सुटीवर आहेत, असे उत्तर मिळाले. खराटे यांचे जागी रिलीवर दिला असे सांगितले. मात्र,रिलीवर कोण याबाबत सांगितले नाही. गेल्या तीन दिवसांपासून रतनवाडी, सोमेश्वरनगर व फुलउमरी येथील नागरिकांना पोस्ट ऑफिसमध्ये रजिस्टर पत्रव्यवहार करण्यासाठी मानोरा तालुका गाठण्याची वेळ आली आहे. जिल्हा डाक विभागाच्या प्रमुखांनी फुलउमरी येथील टपाल कार्यालय तत्काळ सुरू करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.