ट्रकची दुचाकीला जबर धडक; लिपिकाचा जागीच मृत्यू

ट्रक दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात मुंबई येथे नोकरीवर असलेल्या कर्मचा-याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मानोरा ते दिग्रस या रस्त्यावरील भोयर एंटरप्रायजेस दुकानाजवळ 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली.

    मानोरा (Manora).  ट्रक दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात मुंबई येथे नोकरीवर असलेल्या कर्मचा-याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मानोरा ते दिग्रस या रस्त्यावरील भोयर एंटरप्रायजेस दुकानाजवळ 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली. पवन आडे वय (27) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे. ते मुंबई येथील महानगरपालिकेत लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी गर्भवती असून बाळाला बघण्याआधीच त्यांच्यावर नियतीने घाला घातला. या घटनेने एका दिवसाअगोदर आनंदात असलेल्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    प्राप्त माहितीनुसार माहुली येथील रहिवासी पवन जयसिंग आडे वय (27) हा चुलत बहीणीचे 29 एप्रिल रोजी लग्न असल्यामुळे व लहान भाऊ निलेश आडे हा किडनीमुळे गंभीर आजारी असल्यामुळे गावात कुटुंबियासह आला होता. चुलत बहिणीचे 29 एप्रिल रोजी लग्न झाल्यावर घरात आवश्यक सामान आणण्यासाठी एम.एच.37 एस 5873 दुचाकीने मानोरा जात असताना राष्ट्रीय महामार्गवर गिट्टी घेऊन येत असलेल्या भरधाव ट्रक क्रमांक एम.एच.37 टी 1943 ने मानोरा ते दिग्रस रस्त्यावरील भोयर इंटरप्राइजेस दुकाना जवळील पुलाजवळ जबर धडक दिली.या अपघातात पवन आडे चा जागीच मृत्यू झाला. ही घटना मानोरा पोलिसांना कळताच ठाणेदार शिशिर मानकर यांनी पवन आडे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

    मात्र,वैद्यकीय अधिकारी वैभव खडसे यांनी त्यांना मृत घोषित केले. पवन आडे यांचे एक वर्षाअगोदर लग्न झाले होते. पत्नी गर्भवती असल्याची माहिती असून बाळाचा जन्म होण्याअगोदरच पित्याच्या अकाली मृत्यूची वार्ता पसरली.अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.वाहनचालकाविरुद्ध मानोरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याने वाहनचालका विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले आहे.