वाशिम जिल्ह्याच्या नशिबी उसने पालकत्व; केवळ झेंडा टू झेंडा हजेरी

कोरोना महामारीने थैमान घातले असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासन व कोरोना योद्ध्यांची पाठ थापटून त्यांना बळ देण्याची गरज आहे. पालकमंत्री मात्र,गेल्या दोन वर्षांपासून केवळ झेंडा टू झेंडा हजेरी लावत पालकत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.

  रमेश उंडाळ
  वाशिम (Washim). कोरोना महामारीने थैमान घातले असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासन व कोरोना योद्ध्यांची पाठ थापटून त्यांना बळ देण्याची गरज आहे. पालकमंत्री मात्र,गेल्या दोन वर्षांपासून केवळ झेंडा टू झेंडा हजेरी लावत पालकत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या नशिबी पूर्वीप्रमाणेच उसने पालकत्व आले असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहेत.

  जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हावासीयांची झोप उडाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग यासह शासकीय यंत्रणा जीवाचे रान करीत आहेत. असे असले तरी,जिल्ह्यातील कोरोनाची गती कमी होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवा कमी पडत असून अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचे भयावह चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 27 हजारांवर गेली आहे. 23 हजारांच्या आसपास रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. तर, 290 जणांचा बळी गेला आहे. गेल्या तीन महिन्यांत कोरोना संसर्गजन्य आजाराने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले आहे.

  शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागात कोरोनाचे लोण पसरले आहे. त्यामुळे जिल्हा समूह संसर्गाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोचला आहे. त्यावर त्वरीत उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असल्या तरी, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यात दाखल होत जिल्हा प्रशासनाबरोबरच कोरोना योद्ध्यांना बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पालक या नात्याने जिल्हावासीयांना आधार देण्याची गरज असताना पालकमंत्री केवळ ऑनलाईन आढावा घेऊन आपल्या पालकत्वाची जबाबदारी पूर्ण करत असल्याने जिल्हावासीयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कोरोना महामारीने जनता बेजार आहे. तर अनेक जण या संसर्गजन्य आजाराचा फायदा घेत आर्थिक लूट करीत आहेत. खरिप हंगामही अवघ्या महिन्यावर आला आहे.

  त्यामुळे शेतक-यांची सुद्धा लूट होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात तळ ठोकून कोरोना संसर्गजन्य आजाराचा आढावा घ्यावा, रुग्णांना मिळत नसलेले ऑक्सिजन व इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करावा,अशी मागणी जिल्हावासीयांकडून होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य व इतर सर्वांगीण समस्यांचा विचार करता पालक या नात्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

  पालकमंत्री आज जिल्ह्यात
  राज्याचे गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता पणन राज्यमंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे 1 मे 2021 रोजी वाशीम जिल्हा दौ-यावर येत आहेत. 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री देसाई उपस्थित राहणार आहेत.