वाशिम जिल्ह्यात ३९२ गावात पाणीटंचाई; ४२२ विविध उपाययोजना आराखड्यास मंजुरी

वाशिम जिल्ह्यातील 691 गावांपैकी तब्बल 392 गावात पाणीटंचाईच्या झळा बसणे सुरू झाले आहे. या पाणीटंचाईमुळे कोरोनाकाळातही महिलांची व नागरिकांची पायपीट होत असून ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ 392 गावाकरिता तब्बल 422 विविध उपाययोजनांकरिता पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला.

    वाशिम (Washim).  जिल्ह्यातील 691 गावांपैकी तब्बल 392 गावात पाणीटंचाईच्या झळा बसणे सुरू झाले आहे. या पाणीटंचाईमुळे कोरोनाकाळातही महिलांची व नागरिकांची पायपीट होत असून ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ 392 गावाकरिता तब्बल 422 विविध उपाययोजनांकरिता पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला.

    यावर्षी आतापर्यंत सात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून वाशीम तालुक्यातील पाच आणि मानोरा तालुक्यातील दोन विहिरींचा समावेश आहे. तर दोन टँकरचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

    पालकमंत्री देसाई यांनी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला असून यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ज्या गावांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्या ठिकाणी संबंधित विभागाने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, यासाठी जवळपास असलेल्या जलस्त्रोतावरून पाणीपुरवठा करण्यात यावा. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई निवारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच पाणीटंचाई निवारणाची तातडीची उपाययोजना म्हणून गावाजवळ असलेल्या जलस्त्रोतावरून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात यावा.

    पाण्याचे स्त्रोत आटले. ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची आहे. लोकप्रतिनिधींना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पाणीटंचाईसाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील यावर चर्चा करून निर्णय घ्यावा. ज्या नळयोजना नादुरुस्त आहे. त्या तातडीने दुरुस्त कराव्यात.

    स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची देखील तातडीने दुरुस्ती करून ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या काळात पाणीपुरवठा त्वरित उपलब्ध करून देण्याचे काम संबंधित विभागाने करावे. ज्या विहिरीमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तेथून टंचाईग्रस्त गावांना पाणी मिळाले पाहिजे याचे नियोजन करावे, असेही देसाई यांनी सांगितले. 1 मे ते 10 जून या कालावधीत निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने करावी, पाणीपुरवठा योजनांच्या आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. ज्या ठिकाणावरून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

    त्या जलस्त्रोतात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची खात्री करावी, त्यानंतरच तेथून पाणीपुरवठा करावा. पैशाचा योग्य प्रकारे विनियोग करून पाणीटंचाईवर मात करण्याच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले.

    जिल्ह्यात २३.३१ टक्के पाणीसाठा
    जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 127 टक्के पाऊस झाला असून जिल्ह्यातील 136 लघु व मध्यम प्रकल्पामध्ये 23.31 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

    पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
    जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा पाणीटंचाईचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी जिल्हापरिषद अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.