लाकडी घाणे कालबाह्य; उसाचा रस काढण्यासाठी मशीनचा वापर

पूर्वी बैलाच्या किंवा मनुष्याच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागात होता. आता ग्रामीण भागातून लाकडी घाणे लुप्त झाले असून, यंत्राच्या साह्याने उसाचा रस काढला जात आहे.

    शिरपूर जैन (Shirpur Jain).  पूर्वी बैलाच्या किंवा मनुष्याच्या मदतीने लाकडी घाण्यावर ऊसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागात होता. आता ग्रामीण भागातून लाकडी घाणे लुप्त झाले असून, यंत्राच्या साह्याने उसाचा रस काढला जात आहे. विशेष बाब म्हणजे यंत्रातुन काढलेल्या ऊसाच्या रसाची चव बदलली आहे.लाकडी घाण्यातून काढला गेलेला रस शुद्ध व चवदार असायचा.

    यांत्रिक युगात मानवी व लाकडी घाण्याची जागा आता आधुनिक यंत्रसामुग्रीने घेतली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. या उकाड्यापासून शरीराला थंडावा मिळावा, यासाठी अनेकांची पावले आपसूकच रसवंतीकडे वळू लागली आहेत; पण लाकडी घाण्यावरून काढलेल्या रसामध्ये जो स्वाद होता. तो स्वाद यंत्रावरून काढलेला रसाला येत नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळते. जिवाची लाहीलाही होतांना यंत्रातून निघालेला रसही प्यावा लागतो.

    पूर्वी या घाण्यावरील खुळखुळ्याच्या आवाजाने ग्राहक आकर्षित होत. ग्रामीण भागातील सर्वाधिक खपाचे शितपेय म्हणून ओळखला जाणारा ऊसाचा रस शितपेयांच्या स्पर्धेतही टिकून आहे. उन्हाळ्यात विविध ठिकाणी रसवंती दिसून येतात. मोटारीवर चालणा-या यंत्रातून रस काढला जातो. कमी जागेत यंत्रसामुग्रीची व्यवस्था होत असल्याने व्यावसायिकांना त्याचा लाभ होतो. शीतपेयांच्या किमतीच्या प्रमाणात उसाचा रस परवडत असल्याने ग्राहक उसाच्या रसाकडे वळताना दिसतात.