‘रावरंभा’  चित्रपटाचा विशेष खेळ मुंबईतील चित्रा सिनेमागृहात दिमाखात संपन्न झाला.

दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे शशिकांत पवार प्रोडक्शन निर्मित, अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या चित्रपटाची मनोरंजन विश्वात बरीच चर्चा सुरू आहे. 

सुंदर कलाकृतीचा भाग होता आल्याचा आनंद कलाकारांनी बोलून दाखविला. येत्या शुक्रवारी २६ मे ला 'रावरंभा' चित्रपटगृहात दाखल होतआहे. 

एका मोरपंखी प्रेमकहाणीची किनार असलेला ‘रावरंभा’ चित्रपट मनाला स्पर्शून जात असल्याची भावना उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केली. 

'राव’ आणि रंभा' यांचं फुलत आलेलं प्रेम, त्यातच स्वराज्यावर चालून आलेलं बहलोलखान रुपी संकट शिवरायांचे शिलेदार कसे परतवून लावतात? हे दाखवताना ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा म्हणजे ‘रावरंभा’ चित्रपट. 

अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून 'राव’ आणि रंभा'  जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत

सिद्धहस्त लेखक प्रताप गंगावणे यांच्या लेखणीतून ‘रावरंभा’  चित्रपट साकारला आहे. पटकथा  आणि अंगावर काटे आणणारे  जबरदस्त संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.

देवी सातेरी प्रॉडक्शन्सचे प्रभाकर परब या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सहनिर्माते डॉ. अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत. बॉलिवूडच्या तोडीचे छायांकन संजय जाधव यांनी केले असून संकलन फैजल महाडिक यांचे आहे. 

व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापुरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत.

अॅक्शन सीन, सुमधुर संगीत, व्हीएफक्स अशा अनेक गोष्टी ‘रावरंभा’ चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. 

प्रत्येक कलाकार आणि तंत्रज्ञाने त्याचे सर्वोत्तम दिल्यावर उत्कृष्ट कलाकृती साकारली जाते हे ‘रावरंभा' च्या टीमने दाखवून दिले आहे

सोबत उत्तम प्रमोशन आणि मार्केटिंग या जोरावर ‘रावरंभा’ चित्रपट येत्या शुक्रवार पासून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल यात शंका नाही.