भेटी लागी जीवा  लागलीसे आस।  पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।

शुद्ध पक्षातील आषाढ महिन्याच्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी म्हटली की, आपल्याला वेध लागतात ते आषाढी वारीचे.

आषाढी वारीला सुरूवात झाली असून, राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला निघाले आहेत.

आज भल्या पहाटे ते आपल्या पांडुरंगाला भेटतील.

त्याच्या भेटीची जी ओढ त्यांना लागली होती ती विठुरायाच्या भेटीने आज सार्थकी लागणार आहे.

प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. ज्यावर्षी अधिक मास असेल, त्यावर्षी दोन एकादशी अधिक असतात.

म्हणजेच सामान्यपणे वर्षाला २४ असलेल्या एकादशी अधिक मासाच्या वर्षात २६ होतात.

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभ एकादशी म्हणून ओळखली जाते.

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभ एकादशी म्हणून ओळखली जाते.

संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. विठुनामाच्या गजरात तहान-भूक हरपून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात.

आषाढी एकादशी मुहूर्त

आषाढी एकादशी प्रारंभः २९ जून २०२३ पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी ते आषाढी एकादशी समाप्तीः ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटे

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येईल.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात

काही पुराणांमधील उल्लेखानुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळी राजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते.

बळी राजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्रीविष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे.

श्रीविष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात, अशी मान्यता आहे.

त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिकी एकादशी प्रबोधिनी एकादशी नावाने ओळखली जाते.