घरभाड्याच्या बदल्यात नगरसेवकाने 'अश्लील मागणी करताच 'या' अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा

मराठी सिनेसृष्टीतील काही गुणी अभिनेत्रींमध्ये तेजस्विनी पंडितचं नाव आवर्जून घेतलं जातं. अभिनयासोबतच ती आता निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. दरम्यान, या क्षेत्रातला एक भयावह अनुभवही तिने काही महिन्यांपूर्वी शेअर केला होता.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक तेजस्विनी पंडितचा आज वाढदिवस आहे. 23 मे 1986 रोजी जन्मलेली तेजस्विनी आज ३७ वर्षांची झाली.

काही महिन्यांपूर्वी अनेक मराठी चित्रपट आणि मालिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीने पुण्यातील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहताना तिला आलेला अपमानास्पद अनुभव अलीकडेच सांगितला. 

स्ट्रगलिंगच्या काळात नाव कमवण्यासाठी धडपडत असताना पुण्यातील एका नगरसेवकाने आपल्याकडे घाणेरडी मागणी केली होती, असा दावा तेजस्विनीने केला होता.

सौमित्र पोटे यांच्या 'मित्र म्हणे' या पॉडकास्टवर मुलाखत देताना तेजस्विनीने नगरसेवकाचे नाव घेण्याचं टाळत त्याने केलेल्या निर्लज्ज ऑफरविषयी सांगितलं.

साधारणपणे २००९-२०१० च्या काळातली ही गोष्ट आहे. आम्ही पुण्यात सिंहगड रोडवर एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायचो. त्यावेळी माझे एक-दोनच सिनेमे रिलीज झाले होते. ते घर एका नगरसेवकाच्या मालकीचे होते.

मी भाडे देण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याने मला थेट ऑफर दिली. टेबलावर पाण्याचा ग्लास होता, मी तो उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकला.

मी अशा गोष्टी करण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश केला नाही, अन्यथा मी भाड्याच्या घरात राहिले नसते. मी घरासमोर गाड्या उभ्या केल्या असत्या, असं नगरसेवकाला सुनावल्याचं तेजस्विनी म्हणाली.

एवढं बोलून अभिनेत्री थांबली नाही तर ती पुढे म्हणाली की, 'माझ्या व्यवसायामुळे आणि माझी आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांनी माझ्या बाबतीत हे धाडस केलं. पण माझ्यासाठी हा एक शिकण्याचा अनुभव होता.'