बुलढाण्यात कृषी चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट, सोयाबीनची जादा दराने विक्री

बुलढाणा जिल्ह्यात कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याची घटना समोर आली आहे.

नागापूर येथील पिंटू लोखंडकार या शेतकऱ्याला खामगाव सरकी लाईन मधील अंकुर कृषी केंद्र येथे 3600 रुपयाची असलेली सोयाबीनची बॅग 4200 रुपयाला विकली गेली.

म्हणजे सोयाबीनच्या एका बॅगवर त्या शेतकऱ्याकडून 600 रुपये जास्तीचे घेण्यात आले, त्याला पावती मात्र तीन हजार सहाशे रुपयाचीच देण्यात आली.

यापूर्वी देखील बऱ्याच शेतकऱ्यांची अशी आर्थिक लूट केल्याचे समोर आल्याने या सर्व शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्र गाठून चालकाला जाब विचारला. 

त्यानंतर कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा केली असता, कृषी केंद्र चालकांकडून जादा दराने सोयाबीन विकल्या जात असल्याचे निष्पन्न झाले.

याचा पंचनामा करत सदर कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यासंदर्भात उपविभागीय कृषी अधिकारी यांनी वरिष्ठांकडे सदर अहवाल पाठवला असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली.