समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून कुटुंबियांची होणार चौकशी
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढत आहेत. आर्यनला सोडवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
याप्रकरणी त्यांची दोनवेळा सीबीआय चौकशी झाली आहे. आता या प्रकरणात आणखी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. वानखेडे यांच्या बहीण आणि वडिलांचीही उद्या सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आर्यन खान याच्या अटक प्रकरणात खंडणी मागितल्याच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंग, गुप्तचर अधिकारी आशिष रंजनसह के. पी. गोसावी आणि सॅनविल डिसोझा यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. अशातच वानखेडे यांच्या कुटुंबाची सीबीआय चौकशी होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि बहीण सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून सांगण्यात येत आहे.
आर्यन खानच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी 25 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली, अशा आरोपाखाली ‘सीबीआय’ने एफआयआर नोंदवला आहे.
याप्रकरणी समीर वानखेडे यांची सीबीआयच्या पथकाने सुमारे आठ चौकशी केली, त्यानंतर वानखेडेंनी सीबीआयविरोधात याचिका दाखल केली.
न्यायालयाने वानखेडे यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले असून, त्यांना येत्या 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.