ऑनलाईन शॉपिंग करताना वस्तूंचे खोटे रिव्ह्यू कसे ओळखाल ?

ऑनलाईन शॉपिंग करताना आपण त्या वस्तूचा रिव्ह्यू बघत असतो.

मात्र गुगलवर फेक रिव्ह्यूज ही मोठी समस्या आहे. पैसे देऊनही ऑनलाईन रिव्ह्यूज लिहिले जातात.

खोटे (Fake) रिव्ह्यू कसे ओळखता येतील? त्यासाठी काही सोप्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्वसाधारणपणे जे खोटे सकारात्मक रिव्ह्यू असतात त्यात बहुतांश रिव्ह्यूमध्ये पाच स्टार दिलेले असतात आणि बनावट नकारात्मक रिव्ह्यूमध्ये एक स्टार दिलेला आढळतो.

खोट्या रिव्ह्यूमध्ये फक्त स्तुती असते. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजूंबद्दलचं भाष्य त्यात केलेलं नसतं.

आपण लिहिताना सहजपणे लिहितो. नैसर्गिक बाज आपल्या लिखाणात असतो. फेक रिव्ह्यू हे ओढून ताणून लिहिलेले असतात.  काही वेळा वाक्य कॉपी पेस्ट केलेली असतात.

एखाद्या ब्रँडचं नाव खूप वेळा वापरलं असेल आणि मार्केटींग कॅम्पेन असल्यासारखं वाटत असेल, तर तो रिव्ह्यू फेक आहे, असं समजा.

गुगलचं म्हणणं आहे की ते फेक रिव्ह्यू काढून टाकतात आणि बनावट अकाउंट्स बंद करतात.

मात्र तरीही काही रिव्ह्यूज फिल्टर्सची नजर चुकवून निसटतात आणि आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे रिव्ह्यूजवरून निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.