न्यू इअर पार्टीचे प्लानिंग किती सुरक्षित, किती धोक्याचे ?

अगदी जवळच्या आप्तेष्टांबरोबर घरातच छोटेसे गेट टूगेदर करण्याचा तुमचा विचार करेल तर सुरक्षेच्या दृष्टीने सारे काही नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सहज वापरता येण्याजोगे उपाय डॉ. संदीप पाटील सांगत आहेत.

अखेर हे वर्ष संपण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. संपूर्ण जगभरातील लोकांसाठी हे वर्ष आव्हानात्मक ठरले. या वर्षात पॅनडेमिकने ज्यांची जन्मभर खूणगाठ बांधून ठेवाव्यात अशा अनेक गोष्टी शिकवल्या, मग ती आपले हात स्वच्छ ठेवण्याची शिकवण असो किंवा दैनंदिन वेळापत्रकानुसार जगण्याची शिस्त असो किंवा एकमेकांपासून अंतर राखण्याची खबरदारी घेणे असो. यावर्षी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला नेहमीसारखी गजबज आणि झगमगाट असणार नाही. कोविड-19 च्या नव्या लाटेला रोखण्यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशाच्या विविध भागांमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी पाळली जाईल. तेव्हा आपणही सणासुदीचा हा काळ घरच्या घरीच साजरा करणे योग्य ठरेल.

छोट्या जागांत जरा जपून – मास्क घालूनच राहणे उत्तम: सुट्ट्यांचे दिवस म्हणजे जवळीकीचे दिवस, पण छोट्याशा घरगुती जागेत अगदी मोजक्या लोकांनीही जमणे धोक्याचे असू शकते. अशावेळी मास्क लावल्यामुळे एकत्र धोका काही प्रमाणात कमी व्हायला नक्कीच मदत होईल, पण लहानशा जागेत अनेक तासांसाठी एकत्र घालविणे जोखमीचे ठरू शकेल. तेव्हा या भेटीगाठींसाठी एखादी प्रशस्त, हवा खेळती असणारी जागा निवडण्याची काळजी घ्या. एकमेकांपासून योग्य अंतर राखणे हाच सुरक्षित राहण्यासाठीचा एकमेव मूलमंत्र आहे!

आपली सुरक्षितता आपल्या हाती – हॅण्ड सॅनिटायझर हाताशी ठेवा:  हॅण्ड सॅनिटायझर तसेच साबण, पाणी, पेपर टॉवेल्स, टिश्यूज, डिसइन्फेक्टन्ट वाइप्स, नो-टच/ पायांनी उघडबंद करता येण्याजोगे ट्रश कॅन्स (झाकण असलेले अधिक चांगले) अशा सर्व गोष्टींचा पुरेसा साठा करून ठेवा. यामुळे पार्टीमध्ये स्वच्छता व सुरक्षितता बाळगण्यास मदत होईल. घराच्या विविध कोप-यांमध्ये सॅनिटायझरच्या बाटल्या पटकन हाताशी मिळतील अशाप्रकारे ठेवून द्या, म्हणजे पाहुण्यांना गरज भासल्यास त्या चटकन सापडू शकतील.

संगीताच्या ठेक्यावर पावले जरूर थिरकू द्या, पण आवाज कमी ठेवा: हे अगदी खरे आहे! मोठ्या आवाजात संगीत सुरू असले तर माणसांना एकमेकांशी मोठमोठ्याने बोलणे भाग पडते. अवतीभोवती आवाजाचा गोंधळ असेल तर लोक अधिक जोरात बोलतात. म्हणजे थुंकी आणि बरेच काही हवेमध्ये मिसळणार. असे काही घडलेले तुम्हाला नक्कीच चालणार नाही.

वस्तू मिळून मिसळून न वापरलेल्याच ब-या – खानपानासाठी वस्तूंचे स्वतंत्र संच ठेवा:

गोष्टी मिळून मिसळून वापरणे हा मैत्रीचा आत्मा असतो हे खरेच आहे आणि संशोधकांनी ही साथ पसरण्यासाठी अन्नपदार्थांना कुठेही दोषी धरलेले नाही, तरीही बुफे किंवा कॉकटेल्सभोवती एकत्र जमा झाल्याने विषाणू एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते. एकदाच वापरून फेकून द्यायच्या डिस्पोझेबल प्लेट्स आणि ग्लासेस वापरा. प्रत्येक पाहुण्यासाठी या वस्तूंचा स्वतंत्र संच ठेवा म्हणजे कोणाशीही प्रत्यक्ष संपर्क येण्याची शक्यता कमी होईल.

टच मी नॉट – दरवाज्यांचे नॉब्ज, खुर्च्या आणि तुमचा स्पर्श होतो अशी प्रत्येक गोष्ट सांभाळा: कोणत्याही पृष्ठभागावर विषाणूचे अस्तित्व असू शकते ही गोष्ट वारंवार सिद्ध झालेली आहे. त्यामुळे पार्टीची जागा सॅनिटाइझ करा आणि तिथे स्वच्छता राखा. पाहुण्यांकडून सामायिकपणे वापरण्यात येणा-या वस्तूंवर डिसइन्फेक्टन्ट स्प्रे मारून त्यांना निर्जंतुक करा. गेट टूगेदरचे नियोजन करताना रेस्टरूम्सची स्वच्छता अत्यंत काटेकोरपणे पाळली जायला हवी.

ताटात काय असणार त्याकडे लक्ष द्या:  पार्टीसाठीच्या मेन्यूमध्ये आरोग्यासाठी पुरक असेच पदार्थ असायला हवेत आणि त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी. एकदाच वाढण्याची गरज भासेल असे, चविष्ट तरीही आरोग्यकारक असे पदार्थ निवडा. एकमेकांच्या ताटातल्या पदार्थांची देवघेव करू नका. रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी पेये हा चांगला पर्याय ठरू शकेल आणि तुमचे पाहुणेही त्यांचा मनापासून आस्वाद घेऊ शकतील.

व्हर्च्युअल पार्टीचा पर्याय सर्वात उत्तम: या पॅनडेमिकमध्ये प्रत्येकाने डिजिटल बदलांशी स्वत:ला जुळवून घेतले आहे. दूर राहत असलेल्या मित्रमंडळीसाठी व्हर्च्युअल पार्टी हा चांगला पर्याय ठरू शकेल. शिवाय अशा पार्टीमध्ये मोजक्याच माणसांना बोलवायचे बंधन असणार नाही, तुम्ही घरच्या घरीच राहून २०२० ला अलविदा म्हणू शकाल.

अखेरची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये लहानसे गेट टूगेदर करण्याचे तुम्ही ठरवलेच असेल तर कमीत-कमी लोकांना बोलावण्याची काळजी घ्या. अशाप्रकारे तुम्ही स्वत:ची आणि आपल्या आप्तेष्टांची सुरक्षितता जपू शकाल.

(डॉ. संदीप पाटील, चीफ इन्टेन्सिव्हिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल कल्याण)