न्यू इअर रिझोल्युशन अ‍ॅप्सच्या मदतीने संकल्प करा पूर्ण

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला सुरुवात झाली की एक प्रश्न हा सर्रास विचारला जातो, तो म्हणजे ‘काय मग या वर्षाचा तुझा संकल्प काय?’ तसे गेले कित्येक दिवस ते नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवसापर्यंत आपण सोशल मीडिया असो, वर्तमानपत्र, टीव्ही यासारख्या विविध माध्यमांतून अनेक लोकांचे संकल्प काय असतील याच्या अपडेट घेतल्या असतीलच. त्यांचे संकल्प पाहून, ऐकून, वाचून आपल्यालाही असे वाटते की आपणही नवीन वर्षासाठी एखादा संकल्प करावा. तो संकल्प आरोग्यविषयक असो, पैसा किंवा करिअरसंदर्भात किंवा अगदी स्वभावाविषयी का असेना; पण संकल्प करायचा आणि वर्षभरापर्यंत तो संकल्प पाळायचा. जे काही मनात ठरवले आहे ते करून दाखवायचे.

सुरुवातीपासूनच दृढ निश्चय

अगदी जोमाने पहिल्या दिवशी आपण आपला संकल्प पाळायला सुरुवात करतो. पहिले दोन-तीन दिवस अगदी ठरल्याप्रमाणे होतं आणि मग हळूहळू आपले संकल्प बारगळू लागतात.आणि वर्षाच्या शेवटी आपण जे ठरवतो ते काहीच होत नाही, असा अनुभव एका-दोघांना नाही अगदी प्रत्येकाला येत असतो. फार कमी लोक आहेत जे शेवटपर्यंत आपला संकल्प पूर्ण करतात. पण ब-याच लोकांच्या बाबतीत ते होतच नाही. त्यामुळे संकल्प असतातच मोडण्यासाठी असे आपण म्हणतो तेव्हा कशाला करायचे हे संकल्प असेही अनेक जण बोलून दाखवतात.

ॲप्सची मदत

बरेचदा हे संकल्प आपल्या आळशी किंवा विसराळू स्वभावामुळे पूर्णच होत नाहीत. त्यामुळे जे आपल्या नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत अतिशय गंभीर आहेत त्यांच्यासाठी मदत करणारी काही अ‍ॅप्स. तसे आपण मित्र-मैत्रिणींपेक्षा अधिक वेळ हा आपल्या फोनसोबत घालवत असतो. अगदी झोपतानाही काहींच्या बाजूला मोबाईल फोन असतोच. त्यामुळे या फोनचा वापर करून नवीन वर्षाचे संकल्प शेवटपर्यंत पाळण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

साधारण ब-याच लोकांचे संकल्प समान असतात हे तुमच्या लक्षात आलेच असेल. यात भविष्यासाठी पैसे वाचवणे, चांगल्या आरोग्यासाठी डाएट आणि व्यायाम, उत्तम करिअर किंवा नवीन नोकरीचा शोध, व्यसनांपासून मुक्तता, स्वभावामध्ये सकारात्मक बदल असे काही ठरावीक संकल्प जास्तीत जास्त लोकांचे असतात. साधारण एखाद् दुसरा माहिना सरला की या ठरवलेल्या संकल्पाचा आपल्याला विसर पडू लागतो. तेव्हा हे संकल्प कायम तसेच ठेवण्यासाठी काही अ‍ॅप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील.

या अ‍ॅप्सना तुम्ही ‘न्यू इअर रिझोल्युशन अ‍ॅप्स’ असेही म्हणू शकता. कारण तुमचं रिझोल्युशन पूर्ण करायला ते मदत करणार आहेत. तुमचा संकल्प नक्की काय आहे हे एकदा ठरले की हे अ‍ॅप्स डाऊनलोड करायचे. समजा या वर्षीचा तुमचा संकल्प असेल जास्तीत जास्त पैशांची बचत करायची तर तुम्ही लिस्टमधून तशा प्रकारचे अ‍ॅप्स डाऊनलोड करायचे. यातही तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही ते बघू शकता. एकदा का अशा प्रकारातले अ‍ॅप्स तुम्ही डाऊनलोड केले की तुमच्याजवळ किती पैसे आहेत ते टाकायचे. हे अ‍ॅप्स तुम्हाला या पैशांचं योग्य नियोजन करून पैसे वाचवायला मदत करतील. तुम्ही कपडे, हॉटेलिंग किंवा इतर खरेदीसाठी किती पैसे खर्च करता, किती करायला हवे याची मुद्देसूद माहिती हे अ‍ॅप्स देतात. त्यामुळे आर्थिक नियोजनाचा संकल्प शेवटपर्यंत ठेवण्यासाठी तुम्ही या अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता.