300 दहशतवाद्यांचा 24 तासांत खात्मा; अफगाण सैन्याची कारवाई

अमेरिका आणि नाटो देशांचे लष्कर अफगाणिस्तानमधून माघारी जात असताना दुसरीकडे तालिबान पुन्हा डोक वर काढत आहे. अफगाण सैन्याकडून तालिबानविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मागील 24 तासांमध्ये अफगाण सैन्याच्या कारवाईत 300 हून अधिक तालिबानी दहशतवादी ठार झाले असल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

    काबूल : अमेरिका आणि नाटो देशांचे लष्कर अफगाणिस्तानमधून माघारी जात असताना दुसरीकडे तालिबान पुन्हा डोक वर काढत आहे. अफगाण सैन्याकडून तालिबानविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मागील 24 तासांमध्ये अफगाण सैन्याच्या कारवाईत 300 हून अधिक तालिबानी दहशतवादी ठार झाले असल्याचे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

    अफगाणिस्तानच्या दक्षिण प्रांतातील हेलमंदमध्ये शनिवारी झालेल्या कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाले. हेलमंदमध्ये तालिबानी दहशतवादी आणि सरकारी सुरक्षा दलामध्ये संघर्ष होत असतो. हेलमंदमधील प्रांतीय परिषदेचे सदस्य अत्ताउल्लाह अफगान यांनी सांगितले की, मागील काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानच्या हवाई दलाने तालिबानच्या ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.

    या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. अफागाण सैन्याकडून विविध प्रांतामध्ये तालिबानविरोधात कारवाई सुरू आहे. अफगाणिस्तान सरकारकडून हा दावा करण्यात येत असताना दुसरीकडे तालिबानाने हा दावा फेटाळला आहे.

    अमेरिकेने एक जुलैपासून जवळपास सर्वच सैन्य माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर तालिबान आणि अफगाण सैन्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. तालिबानने दुर्गम, ग्रामीण भागातील सरकारी इमारतींवर ताबा मिळवला आहे. काही जिल्ह्यांवर पूर्ण नियंत्रण मिळवले असल्याचेही तालिबानने म्हटले आहे.