या गावाला लागलं ‘हिऱ्यांचं’ वेड, अख्खं गाव खोदलं पण हौस फिटेना, नुसता गोंधळात गोंधळ

बघता बघता, गावात ही बातमी पसरली आणि मेंढपाळाला  डोंगरावर हिरे सापडल्याची बाब घरोघरी पोहोचली. मग काय, प्रत्येकजण त्या डोंगरावर जाऊन येऊ लागला. त्यातील काहीजणांना तिथं हिरे सापडलेदेखील. तर काहीजणांना आजूबाजूच्या परिसरातही हिरे आढळून आले. मग तर सगळ्यांची खात्रीच पटली की हा हिऱ्यांचा डोंगर आहे. डोंगरावर इतके हिरे असतील, तर डोंगराखाली किती असतील? झालं. सगळ्यांनी कुदळ आणि फावडी घेऊन डोंगर खणायला सुरुवात केली. 

    संपत्तीची आणि पैशांची हाव सुटत नाही म्हणतात, तेच खरं. ही गोष्ट आहे दक्षिण अफ्रिकेतल्या क्वालाथी नावाच्या गावाची. या गावातल्या डोंगरावर एक मेंढपाळ मेंढ्या चरायला घेऊन गेला. तिथं त्याला एक हिरा सापडला. त्यानं आजूबाजूला पाहिलं, तर आणखी दोन-तीन हिरे त्याला सापडले. त्याचा आनंद गगनात मावेना. ते हिरे घेऊन तो गावात परतला आणि गावातल्या काहीजणांना त्यानं हा किस्सा सांगितला.

    बघता बघता, गावात ही बातमी पसरली आणि मेंढपाळाला  डोंगरावर हिरे सापडल्याची बाब घरोघरी पोहोचली. मग काय, प्रत्येकजण त्या डोंगरावर जाऊन येऊ लागला. त्यातील काहीजणांना तिथं हिरे सापडलेदेखील. तर काहीजणांना आजूबाजूच्या परिसरातही हिरे आढळून आले. मग तर सगळ्यांची खात्रीच पटली की हा हिऱ्यांचा डोंगर आहे. डोंगरावर इतके हिरे असतील, तर डोंगराखाली किती असतील? झालं. सगळ्यांनी कुदळ आणि फावडी घेऊन डोंगर खणायला सुरुवात केली.

    हळूहळू आजूबाजूच्या गावातही ही बातमी पोहोचली आणि हिऱ्यांचा खजिना मिळवण्यासाठी बाहेरच्या गावातल्या नागरिकांनीही डोंगर खोदायला सुरुवात केली. या दरम्यान, काहीजणांना डोंगर सोडून गावात इतर भागांतही हिरे सापडले. मग त्यांनी गावातही खोदायला सुरुवात केली. हा प्रकार समजल्यावर सरकारनंही यात हस्तक्षेप केला आणि तज्ज्ञांची समिती नेमली. नागरिकांनी खोदकाम बंद करावं, असे आदेश दिले. पण लोकांनी या आदेशाकडं स्वच्छ दुर्लक्ष करत आपलं खोदकाम इमानेइतबारे सुरुच ठेवलं.

    यातील काही हिऱ्यांची सरकारनं तपासणी केली. त्यावेळी प्रत्यक्षात हे हिरे नसून एक प्रकारे स्फटिकं असलेले खडे आहेत, असं सांगितलं. पण सरकार आपल्याला मूर्खात काढून हे हिरे स्वस्तात घेऊन जाईल, असं वाटल्यामुळे लोकांचा काही त्यावर विश्वास बसत नाहीय. सध्या या हिऱ्यांच्या खरेदी आणि विक्रीचा जोरदार व्यवसाय सुरु आहे. सुरुवातीला २०० रुपये असणारी किंमत आता २ हजारांवर गेलीय. असलाच हिरा तर नुकसान नको, म्हणून अनेकजण हे हिरे खरेदी करून ठेवत आहेत. तर हिरा नसला तर नुकसान होईल, म्हणून काहीजण मिळेल त्या बाजारभावाला ते विकूनही टाकत आहेत.

    एकूण, हिऱ्यांच्या नादात अख्खं गाव खोदलं गेलं आहे. ते खरोखरच हिरे आहेत, असं समजून पंचक्रोशीत त्यांचा व्यवहारदेखील तेजीत आहे.