कोविड-19 या महामारीचे मूळ शोधण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणखी वेगात करा; अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना बायडेन यांचे आदेश

कोविड-19 या महामारीचे मूळ शोधण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणखी वेगात करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना दिले. चीनमध्ये कोरोनाची उत्पत्ती झाली असावी, असा अनेक देशांचा कयास आहे. त्या अनुषंगाने अनेक देश याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास करत आहेत. यासाठी मध्यंतरी तज्ज्ञांच्या एका पथकाने वुहान येथील प्रयोगशाळेला भेट देत पाहाणी देखील केली होती.

    वॉशिंग्टन : कोविड-19 या महामारीचे मूळ शोधण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणखी वेगात करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना दिले. चीनमध्ये कोरोनाची उत्पत्ती झाली असावी, असा अनेक देशांचा कयास आहे. त्या अनुषंगाने अनेक देश याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास करत आहेत. यासाठी मध्यंतरी तज्ज्ञांच्या एका पथकाने वुहान येथील प्रयोगशाळेला भेट देत पाहाणी देखील केली होती.

    परंतु, कोरोनाच्या उत्पत्तीबाबत ठोस पुरावे अजूनही हाती आलेले नाहीत. एकूणच जगाला वेठीस धरणाऱ्या या विषाणूंची उत्पत्ती नेमकी कशी झाली याबाबत आता शोध घेतला जात आहे. अमेरिकादेखील याबाबत संशोधन करत असून, अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी नुकत्याच दिल्या आहेत.

    कोरोनाचा संसर्ग झालेल्या प्राण्याचा मानवाशी संपर्क आला का? किंवा प्रयोगशाळेत काही दुर्घटना घडली होती का? आदी निष्कर्ष काढण्यासाठी आवश्यक पुरावे अद्यापही पुरेशा प्रमाणात हाती आले नसल्याचे बायडेन यांनी यावेळी सांगितले. बहुतांश गुप्तचर यंत्रणांना आपल्याकडे असलेली माहिती ही पुरेशी आहे, असे वाटत असते. परंतु, आपल्याकडे दुसऱ्यापेक्षा अधिक माहिती असणे आवश्यक असल्याचे बायडेन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

    यावेळी बायडेन यांनी अमेरिकेतील राष्ट्रीय प्रयोगशाळांना या तपासणीसाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले. तसेच चीनमधून या रोगाची उत्पत्ती कशी झाली, तसेच या मागे काय उद्दिष्ट होते, याबाबतच्या आंतरराष्ट्रीय तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले.