The bloody game of the Taliban

अमेरिकी सैन्याने देश सोडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. अफगाणिस्तान अधिकृतपणे अमेरिकन सैन्यापासून मुक्त आहे. अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. त्यांचा हाच आनंद त्यांनी साजराही केला आहे. अमेरिकन सैन्याचे शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार तसेच आतिषबाजी करत आपला आनंद साजरा केला. काबूल विमानतळाच्या धावपट्टीवरून तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, अफगाणिस्तानचे अभिनंदन, हा विजय आपल्या सर्वांचा आहे.

    काबुल : अफगाणिस्तानात तालिबानविरोधात सुमारे 20 वर्षे चाललेल्या लढ्यात मानहानिकारक पराभव झाल्यानंतर अमेरिकन सैनिकांनी त्यांचा गड असलेल्या काबुल विमानतळाला अलविदा केला आहे. सोमवारी मध्यरात्री अमेरिकन सैन्य तब्बल 20 वर्षांनी अफगाणिस्तानातून बाहेर पडले. यापूर्वी टप्याटप्याने त्यांनी आपले सैन्य कमी केले होते. अफगाणिस्तानातील आमची 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपुष्टात आली आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली. 20 वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर आपल्या सैनिकांना घेऊन येणाऱ्या अमेरिकेच्या शेवटच्या विमानाने अफगाणिस्तान सोडले.

    अफगाणिस्तानातून बाहेर पडलेला शेवटचा अमेरिकन सैनिक मेजर जनरल क्रिस डोनह्यू आहे, असे अमेरिकेतील संरक्षण विभागाने पेंटॅगॉनने घोषित केले. त्यामुळे आता अफगाणिस्तान हा अमेरिकी लष्कराच्या वर्चस्वापासून अधिकृतरित्या मुक्त झाला आहे.

    अमेरिकी सैन्याने देश सोडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले आहे. अफगाणिस्तान अधिकृतपणे अमेरिकन सैन्यापासून मुक्त आहे. अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. त्यांचा हाच आनंद त्यांनी साजराही केला आहे. अमेरिकन सैन्याचे शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार तसेच आतिषबाजी करत आपला आनंद साजरा केला. काबूल विमानतळाच्या धावपट्टीवरून तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, अफगाणिस्तानचे अभिनंदन, हा विजय आपल्या सर्वांचा आहे. आम्हाला अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आम्ही त्या सर्वांशी चांगल्या राजनैतिक संबंधांचे स्वागत करतो.

    अफगाणिस्तानवर ताबा मिळविलेल्या तालिबानसाठी डोकेदुखी आणि आव्हान ठरलेल्या पंजशीर खोऱ्यावर तालिबानने हल्ला केला. सोमवारी रात्री झालेल्या लढाईत सात ते आठ तालिबानींना कंठस्नान घातल्याचा दावा फहीम दाष्टी यांनी केला आहे. ते अहमद मसूदचे प्रवक्ते आहेत. अहमद मसूद पंजशीर खोऱ्यात तालिबान विरोधी चळवळीचे नेतृत्व करत आहे. तालिबानने पंजशीर खोरे वगळता संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले आहे. तालिबानला आतापर्यंत कधीच पंजशीर जिंकता आलेले नाही. पंजशीरमध्ये तालिबानला विरोध करण्यासाठी अफगाण लष्करातील योद्धे आणि अन्य फायटर्स एकवटले आहेत.

    युद्ध आणि शांततेसाठी आम्ही तयार आहोत, असे पंजशीरमधल्या योद्ध्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तालिबानना अन्य प्रांतांप्रमाणे पंजशीर सहजतेने मिळवता येणार नाही, हे आधीच स्पष्ट होते. तिथे घनघोर लढाईची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आता सुरुवात त्या दिशेने होताना दिसत आहे. फहीम दाष्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री तालिबानने हल्ला केला. यामध्ये दोन्ही बाजूला लोक जखमी झाले आहेत. सात ते आठ तालिबानी बंडखोर ठार झाल्याची माहिती त्यांनी दिली.