mehul choksi

मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला डोमिनिका (Dominica) हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर चोक्सी अँटिग्वा अँड बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे.

    अँटिग्वा : पीएनबी बँक (PNB Scam) घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ला डोमिनिका (Dominica) हायकोर्टानं आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर चोक्सी अँटिग्वा अँड बार्बुडा (Antigua and Barbuda) येथे पोहोचला आहे. डोमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली त्याला तेथे ५१ दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. भारतातून फरार झाल्यानंतर चोक्सी २०१८ पासून अँटिग्वा आणि बार्बुडा येथे वास्तव्यास आहे. त्याने तिथलं नागरिकत्वही घेतले आहे.

    चोक्सीवर डोमिनिकामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याचा आरोप आहे. तर चोक्सीचं अपहरण करण्याचा कट होता, असा दावा त्याच्या वकिलानं केला आहे. डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीला त्याच्या उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दहा हजार ईस्टर्न कॅरिबियन डॉलर्स (जवळपास पावणे तीन लाख) भरल्यानंतर कोर्टाने चोक्सीला अँटिग्वा येथे जाण्यास परवानगी दिली. जामीन मिळण्यासाठी चोक्सीनं आपला मेडिकल रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. ज्यात ‘सीटी स्कॅन’चा समावेश होता. अहवालात त्याच्या ‘हेमाटोमा’ (मेंदूशी संबंधित आजार) ची स्थितीत समस्या असल्याचं म्हटलं आहे.

    डॉक्टरांनी ‘न्यूरोलॉजिस्ट’ आणि ‘न्यूरोसर्जिकल’ सल्लागाराद्वारे चोक्सीच्या मेडिकल स्थितीचा त्वरित आढावा घेण्याचा सल्ला दिला होता. ‘सीटी स्कॅन’ रिपोर्ट २९ जून रोजी देण्यात आला होता, त्यावर डोमिनिकाच्या प्रिन्सेस मार्गारेट हॉस्पिटलमधील डॉक्टर येरेन्डी गॅले गुटेरेझ आणि रेने गिलबर्ट व्हेरेन्सयांनी स्वाक्षरी केली होती. या आजारावरील उपचार सुविधा सध्या डोमिनिकामध्ये उपलब्ध नाहीत, असे रिपोप्टमध्ये म्हटलं होतं.

    मेहुल चोक्सी (Mehul Choksi) त्याच्या कथित अपहरण नाट्यामुळे चर्चेत आला होता. अँटीग्वामधून (Antigua) डोमिनिकाला गेलेल्या चोक्सीनं आपल्याला भारतात परत नेण्यासाठी भारत सरकारनं जबरदस्तीनं डोमिनिकाला (Dominica) नेल्याचा आरोप केला होता. मात्र अँटीग्वा सरकार त्याला परत भारतात पाठविण्यासाठी तयार असल्याचं त्यानं स्वतःच आपल्या अपहरण नाट्याची कहाणी तयार केल्याची धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर स्रोतांनी उघडकीस आणली होती.