भारतातील शेतकरी आंदोलनाची झळ लंडनमध्ये, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

‘आम्ही पंजाबमधील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहोत’ असे फलक हातात घेऊन काही नागरिक मध्य लंडनमध्ये रस्त्यावर उतरले. मात्र सध्या कोरोना संसर्गाच्या काळात आंदोलनांना परवानगी नसल्यामुळे स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी तातडीने पावलं उचलत त्यांना ताब्यात घेतलंय. लंडनमधील कायद्यानुसार ३० पेक्षा अधिक जणांना एकावेळी एकत्र येण्यावर मनाई आहे आणि हा नियम तोडल्यास तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावली जाते.

दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनाची झळ आता लंडनपर्यंत पोहोचलीय. मध्य लंडन परिसरात भारतीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या काहीजणांना स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भारतीय उच्चायोगाच्या परिसरात काहीजण आंदोलन करणार असल्याची माहिती अगोदरच स्कॉटलंड यार्ड पोलिसांना मिळाली होती.

‘आम्ही पंजाबमधील शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहोत’ असे फलक हातात घेऊन काही नागरिक मध्य लंडनमध्ये रस्त्यावर उतरले. मात्र सध्या कोरोना संसर्गाच्या काळात आंदोलनांना परवानगी नसल्यामुळे स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी तातडीने पावलं उचलत त्यांना ताब्यात घेतलंय. लंडनमधील कायद्यानुसार ३० पेक्षा अधिक जणांना एकावेळी एकत्र येण्यावर मनाई आहे आणि हा नियम तोडल्यास तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावली जाते.

या आंदोलनात मुख्यत्वे पंजाबी-ब्रिटीश नागरिक सहभागी झाले होते. लंडनमध्ये स्थायिक झालेले मात्र मूळचे पंजाबी असलेले नागरिक या कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेले दिसले. या आंदोलनाची हाक कुणी दिली आणि त्यामागे काही परकीय शक्तींचा हात आहे का, याचा तपास करत असल्याची माहिती भारतीय उच्चायोगातील प्रवक्त्यांनी दिलीय.

विशेष म्हणजे २ दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या ३६ खासदारांनी भारतीय कृषी कायद्यांना विरोध दर्शवणारं पत्र ब्रिटनच्या विदेश सचिवांना उद्देशून लिहिलं होतं. ब्रिटन सरकारने या कायद्यांना आपला विरोध असल्याचं भारत सरकारला कळवावं, अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. मात्र अद्याप ब्रिटन सरकारनं या मागणीची कुठलीही दखल घेतलेली नाही.