कोरोनाची लस टोचल्यावर दारू पिता येणार नाही!; वाचा काय आहे सत्य

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार रशियाने विकसीत केलेली स्फुटनिक व्ही या कोरोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतर नागरिकांनी दोन महिने दारू पिऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

लंडन. संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोनावर अखेर लस तयार करण्यात यश आले असून रशिया आणि ब्रिटनमध्ये नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, या लसीचा प्रभाव राहण्यासाठी आणि तो दीर्घकाळ टिकवण्यासाठी लसीचा डोस घेतल्यानंतर नागिरकांनी दोन महिने मद्यपान करू नये, अशी सूचना रशियाच्या आरोग्य विभागाने केली आहे.

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार रशियाने विकसीत केलेली स्फुटनिक व्ही या कोरोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतर नागरिकांनी दोन महिने दारू पिऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. रशिया अल्कोहोल घेणाऱ्यांच्या संख्येत जगात चौथ्या स्थानावर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. त्यामुळे कोरोनाची लस घेतल्यानंतर ४२ दिवस सुमारे दोन महिने नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन रशियाचे उपपंतप्रधान टॅटिना गॅलिकोवा यांनी केले आहे. दोन महिन्यानंतर या लसीचा प्रभाव दिसतो. त्यानंतर कोरोना संक्रमणापासून बचाव होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

स्फुटनिकची लस घेतल्यानंतर दोन महिने मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, लोकांशी संपर्क टाळणे आणि महत्त्वाचे म्हणजे लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यपान करू नये, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. या सर्व गोष्टींचे पालन केल्यास दोन महिन्यानंतर लसीचा प्रभाव दिसण्यास सुरुवात होते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यपान करू नये, असे रशियाच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख  पोपोवा यांनी सांगितले. रशियात मास्कोमध्ये कोरोनाची लस देण्यास सुरवात झाली आहे.