भारताची हवा खराब म्हणणाऱ्या अमेरिकेचीच हवा आहे खराब

भारत विषारी हवा सोडणारा देश आहे, असं म्हणणाऱ्या अमेरिकेचीच हवा खराब असल्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिका हा सर्वांत कमी कार्बन उत्सर्जन करतो, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र आकडेवारीतून उघड झालेलं सत्य काही वेगळंच आहे.

दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाने २०१९ मध्ये एमिशन गॅप रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यानुसार याआधी आणि आताही अमेरिकेत सर्वांत जास्त ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन होत आहे. ग्रीन हाऊस गॅसच्या दरडोई उत्सर्जनाचा विचार केल्यास अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आणि एकूण उत्सर्जनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतावर केली होती टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर टीका केली होती. भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांनी अध्यक्षीय वादविवादात पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर आपल्या धोरणांचा बचाव करण्यासाठी भारत, चीन आणि रशियावर निशाणा साधला होता. अमेरिका हा सर्वांत कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्याउलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे, असे म्हणत हे देश प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता.

कोणतीही ठोस उपाययोजना नाही

क्लायमेट अ‍ॅक्शन ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या या संकटात अमेरिकेत विषारी वायूंचे उत्सर्जन हे १० टक्क्यांनी कमी होणार आहे. या चर्चेमध्ये कोणत्याही प्रश्नावर ट्रम्प यांच्याकडे योग्य धोरण नाही असे दिसले. ट्रम्प प्रशासनाकडे ग्रीन गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. डाउन टू अर्थच्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या काळात तापमान कमी होणार आहे. त्यामुळे या काळात कमी झालेले तापमान हे आमच्या पर्यावरण नीतीमुळे कमी झाल्याचे सांगत ट्रम्प प्रशासन याचे श्रेय घेईल, असे देखील रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प प्रशासन अयशस्वी

निवडणुकीनंतर ट्रम्प सरकार पॅरिस करारामधून बाहेर पडण्याची तयारी करत आहे. त्यामुळे इराण आणि तुर्कीप्रमाणेच अमेरिकादेखील या करारातून बाहेर पडेल. त्याचबरोबर शुद्ध हवा, वन्यजीवन आणि विषारी केमिकल या बाबतीतही ट्रम्प प्रशासन अयशस्वी ठरले आहे. भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावरून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडन यांनी ट्रम्प यांना सुनावले आहे. ट्रम्प यांनी भारतातबाबत केलेल्या विधानावर जो बिडन यांनी नाराजी व्यक्त केली होती.