amrulla saleh

अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह(Amrullah Saleh) यांनी तालिबान्यांना इशारा दिला आहे. पंजशीरमधील नागरिक तालिबानला जशास तसे उत्तर देतील असे सालेह यांनी म्हटले आहे.

    तालिबानने(Taliban) अफगाणिस्तानावर(Afghanistan) कब्जा मिळवला आहे. दहशतवादी तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तानमधील अनेक नागरिक दुसऱ्या देशांमध्ये पळून जात आहेत. दरम्यान तालिबान्यांना पंजशीरवर ताबा मिळवण्यात अपयश आलं आहे. अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह(Amrullah Saleh) यांनी तालिबान्यांना इशारा दिला आहे. पंजशीरमधील नागरिक तालिबानला जशास तसे उत्तर देतील असे सालेह यांनी म्हटले आहे. अमरुल्ला सालेह सध्या पंजशीरमध्ये आहेत. अहमद मसूद यांच्यासोबत नॉर्थन अलायन्स तालिबानविरुद्ध उभे ठाकले आहे. अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला कार्यकारी राष्ट्रपती घोषित केलं आहे.

    सालेह यांनी सांगितले की, “ देशातील नागरिकांना स्वतंत्रपणे जीवन जगता यावं,हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही अफगाणिस्तानला तालिबानीस्तान बनू देणार नाही. अफगाणी लोकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. दडपशाहीत ते अशक्य होण्याची शक्यता असते. राष्ट्रपती अशरफ घनी यांनी लोकांची फसवणूक केली आहे. ते देशाला संकटात टाकून पळून गेले आहेत. पण आम्ही दडपशाही सहन करणार नाही. त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ”.
    “पंजशीर भागात तालिबानचं काहीही अस्तित्व नाही. पंजशीरमधील नागरिक सतर्क असून तालिबानसमोर झुकणार नाहीत. आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. आम्हाला शांतता हवी आहे. पण जर तालिबानला लढाई करायची असेल, तर आम्हीही तयार आहोत. अहमद मसूद तालिबानशी लढा देत आहेत. प्रत्येक जण त्यांच्यासोबत उभा आहे.” असेही सालेह यांनी स्पष्ट केले.