China builds 'Super Soldier'; Concern for the world, including the United States

जगामध्ये सुपरपॉवर बनण्याची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यासाठी चिनी सरकार लष्करी सिद्धतेवर अधिक भर देत आहे. अण्वस्त्रक्षमता वाढवण्याच्या चीनच्या हालचाली लपून राहिलेल्या नाहीत. आता आपल्या सैनिकांनाही 'सुपर सोल्जर' बनवण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गुप्तपणे 'सुपरह्यूमन प्रोजेक्ट' राबविला जात आहे. जगभरातील 52 देशांमधील 80 लाखांहून अधिक गर्भवती महिलांच्या जनुकीय माहितीचा (जेनेटिक डाटा) चिनी शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर चीन हा कोणत्याही वातावरणात, कोणत्याही परिस्थितीत तहानभूकेची जाणीव न होता चपळाईने लढणारी सैनिकांची पिढी निर्माण करू शकणार आहे.

  बीजिंग : जगामध्ये सुपरपॉवर बनण्याची चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यासाठी चिनी सरकार लष्करी सिद्धतेवर अधिक भर देत आहे. अण्वस्त्रक्षमता वाढवण्याच्या चीनच्या हालचाली लपून राहिलेल्या नाहीत. आता आपल्या सैनिकांनाही ‘सुपर सोल्जर’ बनवण्याचे चीनचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गुप्तपणे ‘सुपरह्यूमन प्रोजेक्ट’ राबविला जात आहे. जगभरातील 52 देशांमधील 80 लाखांहून अधिक गर्भवती महिलांच्या जनुकीय माहितीचा (जेनेटिक डाटा) चिनी शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर चीन हा कोणत्याही वातावरणात, कोणत्याही परिस्थितीत तहानभूकेची जाणीव न होता चपळाईने लढणारी सैनिकांची पिढी निर्माण करू शकणार आहे.

  आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने करणार बदल

  चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) या प्रकल्पासाठी ‘बीजीआय’ या चिनी कंपनीची मदत घेतली आहे. जगभरातील गर्भवती महिलांच्या प्रसूतीपूर्व चाचण्यांसंदर्भातील कामाशी या कंपनीचा संबंध येतो. या चाचण्यांच्या बहाण्याने गर्भवतींची जनुकीय माहिती जमा केली जात आहे. त्यात महिलांचे वय, वजन, उंची, जन्मस्थळ आदींची माहिती असते. त्या माहितीच्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अद्ययावत तंत्रज्ञानाने भविष्यात निर्माण होणाऱ्या संततीमध्ये शारीरिक बदल करून महाशक्तिशाली सैनिक घडवण्याचा चीनचा डाव आहे.

  लडाख सीमेवरील सैनिकांवर प्रयोग सुरू

  सुपरह्यूमन प्रोजेक्टची सुरुवात चीनने लडाख सीमेवरील सैनिकांकडून केली असल्याचे वृत्त आहे. सैनिकांमधील जनुकांमध्ये बदल करून त्यांना गंभीर आजारांपासून सुरक्षित केले जात आहे. लडाखसारख्या उंच ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना बहिरेपणा व अन्य गंभीर आजार जडतात. या प्रयोगामुळे त्यांची त्यापासून सुटका होणार आहे. चीनच्या अशा कारवायांमुळे भारतीय लष्कराचीही डोकेदुखी वाढली आहे.

  अमेरिकेलाही धडकी

  चीनच्या या गुप्त प्रकल्पाची माहिती अमेरिकन गुप्तहेरांना मार्च महिन्यातच समजली होती. त्याची कल्पना त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाही दिली होती. चीनचा हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात चीनचे लष्कर हे जगातील सर्वात मजबूत आणि सक्षम असेल अशी अमेरिकन तज्ज्ञांना भीती आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून रोग निर्माण करणारे जीवाणू, विषाणू विकसित करता येतील आणि त्याद्वारे गंभीर आजार पसरवता येतील. तसे झाल्यास जगभरातील औषध कंपन्याही चीनच्या मुठीत येतील आणि त्याद्वारे तो संपूर्ण जगाविरुद्ध कटकारस्थाने करू शकेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.