दलाई लामांचा वाढदिवस साजरा केल्यामुळे चीनचा झाला जळफळाट, सिंधू नदीजवळ निषेध दर्शवण्यासाठी केली फलकबाजी

दलाई लामा(Dalai lama`s Birthday) यांचा वाढदिवस साजरा केल्याने चीनला वाईट वाटलं आहे. चीननं पुन्हा एका सीमेवर आक्रमक बाणा दाखवण्यास सुरुवात केली आहे.

    भारत-चीन सीमावाद(India- China Dispute) गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यात आता दलाई लामा(Dalai lama`s Birthday) यांचा वाढदिवस साजरा केल्याने चीनला वाईट वाटलं आहे. चीननं पुन्हा एका सीमेवर आक्रमक बाणा दाखवण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने(Peoples Liberation Army) देमचुक येथील सिंधु नदीजवळ विरोध दर्शवण्यासाठी फलकबाजी आणि चीनी झेंडे फडकवले. यावेळी चीने लष्करासोबत काही नागरिकही उपस्थित होते.

    ही घटना ६ जुलैची आहे. या दिवशी देमचुकमधील स्थानिक नागरिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करत होते. यावेळी तिथे पाच वाहनं पोहोचली आणि दीड तास त्यांनी निषेधाचे फलक या भागात झळकावले.

    दलाई लामा गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहात आहेत. त्यामुळे चीननं अनेक वेळा या प्रकरणी आपला विरोध दर्शवला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८६ वर्षीय दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचबरोबर दलाई लामा यांच्याशी फोनवर बोलणं झाल्याचं जाहीररित्या सांगितलं होतं.

    नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच त्यांनी याबाबत जाहीररित्या सांगितलं आहे. तिबेट सरकारकडून लवकरच दलाई लामा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील असं सांगण्यात आलं आहे. कोरोना स्थिती निवळल्यानंतर ही भेट होईल असं सांगण्यात आलं आहे. मोदींनी दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चीन एकप्रकारे इशाराच दिला आहे. दुसरीकडे, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीला नुकतीच १०० वर्षे झाली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही शुभेच्छा दिल्या नाहीत.

    एप्रिल २०२० मध्ये चीननं लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारत-चीन दरम्यान तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. यावेळी दोन्ही सैन्यदलात अनेकदा धक्काबुक्की झाल्याची प्रकरणं समोर आली होती. दोन्ही देश सीमावाद सामंजस्यपणे सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र कोणताही मार्ग निघू शकलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चेची दारं बंद आहेत.