तालिबान आणि नॉर्दन आघाडीत संघर्ष, पंजशीरमध्ये तब्बल ‘इतक्या’ तालिबान्यांचा खात्मा, नॉर्दन आघाडीचा दावा

तालिबान आणि नॉर्दन आघाडीत मागील बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. पण याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही. यानंतर आता, तालिबानच्या 600 बंडखोरांना ठार केल्याचा दावा नॉर्दन आघाडीकडून करण्यात आला आहे.

    काबूल : तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून देशात हिंसाचार वाढत चालला आहे. तालिबान संघटना एकीकडे सरकार बनवण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीच्या सैनिकांशी लढा देत आहे. काबूलपासून उत्तरेकडे 100 किमी अंतरावर असणाऱ्या पंजशीर खोऱ्यात अद्याप तालिबानला नियंत्रण मिळवता आलं नाही.

    दरम्यान त्यामुळे याठिकाणी तालिबान आणि नॉर्दन आघाडीत मागील बऱ्याच दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. पण याची अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही. यानंतर आता, तालिबानच्या 600 बंडखोरांना ठार केल्याचा दावा नॉर्दन आघाडीकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर जवळपास 1000 तालिबान्यांना कैद केल्याचंही आघाडीकडून सांगण्यात आलं आहे. यातील अनेकांनी शरणागती पत्करल्याचं म्हटलं आहे. स्पुतनिक न्यूजच्या मते, हा दावा नॉर्दन आघाडीचे प्रवक्ते फहीम दशती यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. विशेष म्हणजे तालिबाननं शनिवारी पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा केला होता. पण यानंतर नॉर्दन आघाडीचे नेते अमरुल्ला सालेह यांनी हा दावा नाकारला आहे.

    पंजशीर असा एकमेव प्रांत आहे, ज्यावर तालिबानला अद्याप ताबा मिळवता आला नाही. माजी अफगाण गोरील्ला कमांडर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वात याठिकाणी तालिबान विरुद्ध लढा दिला जात आहे. विशेष म्हणजे 1996 ते 2001 दरम्यान तालिबान राजवटीतही तालिबानला पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवता आला नव्हता. यानंतर आताही संपूर्ण देश तालिबानच्या ताब्यात गेला असला तरी, पंजशीरमध्ये अद्याप संघर्ष सुरूच आहे. दरम्यान पंजशीर प्रांतातील 7 पैकी 4 जिल्ह्यांवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला आहे.

    सालेह यांनी काय संदेश दिलाय?

    अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी एका व्हिडीओ संदेश प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये सालेह यांनी सांगितलं की, ‘दोन्ही गटाकडून पंजशीरमध्ये युद्ध सुरूच आहे. ‘आम्ही कठीण परिस्थितीत आहोत यात काही शंका नाही. तालिबान्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे. पण आम्ही शरणागती पत्करणार नाही. आम्ही अफगाणिस्तानसाठी शेवटपर्यंत लढत राहू. मी देश सोडल्याच्या बातम्या खोट्या आहेत हे लोकांना आश्वासन देण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर केला आहे.’