दाऊद आमच्या देशात नाही; पाकिस्ताननं मारली पलटी

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, पाकिस्तानकडून नवे निर्बंध घातले जात आहेत. अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा दावा चुकीचा आहे आणि निरर्थक आहे. त्यात कोणतीही सत्यता नाही. त्यामुळे हे वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारे आहे.

इस्लामाबाद : दहशतवादांच्या मुक्कामाचे तसेच प्रशिक्षणाच्या हक्काचे ठिकाण ही पाकिस्तानची ओळख झाली आहे. फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्सच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंधांची कारवाई केली आहे. त्यामध्ये दाऊद इब्राहिमच्या नावाचा समावेश आहे. कराची क्लिफ्टन, सौदी मशिदीजवळ व्हाइट हाऊस असा दाऊदचा पत्ता पाकिस्तानने दिला होता. तसेच दाऊद कराचीमध्ये असल्याच्या अधिसूचनेनंतर हे वृत्त भारतात सगळीकडे प्रसिद्ध झालं.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याची माहिती पाकिस्तानने दिली होती. मात्र आता २४ तासांच्या आतच पाकिस्तानने यू-टर्न घेत दाऊद आपल्या देशात वास्तव्यास नसल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, पाकिस्तानकडून नवे निर्बंध घातले जात आहेत. अशा बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. परंतु दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा दावा चुकीचा आहे आणि निरर्थक आहे. त्यात कोणतीही सत्यता नाही. त्यामुळे हे वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारे आहे.


मागील काही दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करत असल्याचे ठोस पुरावे भारताने एफएटीएफला सादर केले होते. त्यामुळे एफएटीएफ पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा विचार करत आहे. मात्र ही कारवाई झाली, तर पाकिस्तानला जगातील कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेकडून कर्ज मिळवणे कठीण होणार आहे.