अँटिव्हायरस सॉफ्टवेअर McAfee च्या संस्थापकाचा मृत्यू; स्पेनच्या कारागृहात आढळला मृतदेह

स्पेनमधील नॅशनल कोर्टाने बुधवारी जॉन मॅकॅफे यांच्या अमेरिका प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली होती. अमेरिकेने नोव्हेंबरमध्ये प्रत्यार्पणासाठी केलेल्या विनंतीमध्ये मॅकॅफेने चार वर्षांत १० मिलियन युरोज कमावले असून आयकर भरलेला नाही. जॉन मॅकॅफे यांनी १६ जून रोजी ट्वीट करत अमेरिकन प्रशासनाकडे चुकीची माहिती असल्याचं म्हटलं होतं.

    अँटिव्हायरस सॉफ्टवेअरचे संस्थापक जॉन मॅकॅफे यांचा मृत्यू झाला असून स्पेनमधील कारागृहात त्यांचा मृतदेह आढळला आहे. ७५ वर्षीय जॉन मॅकॅफे बार्सेलोना येथील जेलमध्ये होते. जॉन मॅकॅफे यांनी आत्महत्या केल्याचा संशय कारागृह अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्पॅनिश कोर्टाने त्यांच्या अमेरिका प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्यानंतर काही वेळातच मृतदेह आढळला असल्याची माहिती कारागृह अधिकाऱ्याने दिली आहे.

    ३० वर्षांची शिक्षा

    एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, कर चुकवल्या प्रकरणी जॉन मॅकॅफे अमेरिकेकडून फरार घोषित करण्यात आले होते.जॉन मॅकॅफे यांना ऑक्टोबर २०२० मध्ये बार्सेलोना विमानतळावरुन अटक करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. इस्तंबूलसाठी विमान पकडत असताना त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली होती.कन्सल्टिंग, क्रिप्टोकरन्सी तसंच आपल्या आयुष्यावरील आधारित कथानकांसाठी हक्क विकत कोट्यावधींची कमाई केल्यानंतरही २०१४ ते २०१८ या काळात त्यांनी जाणुनबुजून कर चुकवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. जर त्यांच्यावरीवल आरोप सिद्ध झाले असते तर त्यांना किमान ३० वर्षांचा कारावास झाला असता.

    स्पेनमधील नॅशनल कोर्टाने बुधवारी जॉन मॅकॅफे यांच्या अमेरिका प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली होती. अमेरिकेने नोव्हेंबरमध्ये प्रत्यार्पणासाठी केलेल्या विनंतीमध्ये मॅकॅफेने चार वर्षांत १० मिलियन युरोज कमावले असून आयकर भरलेला नाही. जॉन मॅकॅफे यांनी १६ जून रोजी ट्वीट करत अमेरिकन प्रशासनाकडे चुकीची माहिती असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी आपली संपत्ती जप्त करण्यात आली असल्याचंही सांगितलं होतं.