donald trump

कॅपिटल बिल्डिंगमध्ये हिंसा भडकवल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये झालेल्या मतदानादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाच्या बाजूने २३२ मतं पडली तर त्यांच्याविरोधात १५७ मतं पडली. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांमध्ये २२२ डेमोक्रॅट होते तर रिपब्लिकन पक्षाच्या १०  प्रतिनिधींनीदेखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आणि महाभियोग प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. महाभियोग प्रस्ताव मंजूर होण्यासाठी २१८ मतांची आवश्यकता होती.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग  प्रस्ताव मंजूर झालाय. राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सलग दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरलेत. डेमोक्रॅटिक पक्षाचा दबदबा असणाऱ्या प्रतिनिधी सभेत, भारतीय वेळेनुसार बुधवारी मध्यरात्री डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

कॅपिटल बिल्डिंगमध्ये हिंसा भडकवल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये झालेल्या मतदानादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाच्या बाजूने २३२ मतं पडली तर त्यांच्याविरोधात १५७ मतं पडली. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांमध्ये २२२ डेमोक्रॅट होते तर रिपब्लिकन पक्षाच्या १०  प्रतिनिधींनीदेखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आणि महाभियोग प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. महाभियोग प्रस्ताव मंजूर होण्यासाठी २१८ मतांची आवश्यकता होती.

राजकीय संकट गडद

या कारवाईनंतर आता अमेरिकेतील राजकीय संकट अधिक गडद होत आहे. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह नंतर आता सिनेटमध्ये हा प्रस्ताव जाईल. जर सिनेटमध्ये ही महाभियोग प्रस्तावावर शिक्कामोर्तब झालं, तर डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची कारकीर्द संपण्यापूर्वी पदावरून पायउतार व्हावे लागेल. सिनेटमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश मतांची आवश्यकता असते.

सिनेटमध्ये काय होणार?

सिनेटमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाकडे ५० तर रिपब्लिकन पक्षाकडे ५१ सदस्य आहेत. अशा परिस्थितीत महाभियोग प्रस्ताव मंजूर होणं आव्हानात्मक आहे. मात्र रिपब्लिकन पक्षातील काही सदस्य देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असल्याचे दिसत असल्यामुळे सिनेटमध्येदेखील हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसऱ्यांदा महाभियोग

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर २०१९ सालीदेखील महाभियोग चालवण्यात आला होता. मात्र त्यावेळी सिनेटमध्ये असलेल्या बहुमताच्या जोरावर डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव हाणून पाडण्यात यश मिळवलं होतं. महाभियोग लागल्यानंतरही निवडणूक लढवणारे पहिले राष्ट्रपती ही नोंद देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे लागली होती.

शांततेचं आवाहन

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या वतीने जारी केलेल्या निवेदनामध्ये आपण हिंसेचं समर्थन करत नसल्याचे म्हटले आहे. समर्थकांनी कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये, असं आवाहनदेखील त्यांनी केलंय. कुठल्याही कायद्याला धक्का लागता कामा नये, कोणीही तणावाचं वातावरण निर्माण करू नये आणि शांतता बाळगावी असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.