अमेरिकेत डझनभर चिनी कंपन्या ‘ब्लॅकलिस्ट’

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने या निर्णयाला दुजोरा दिला आहे. एसएमआयसी चीनच्या सैन्य-नागरी संचालन सिद्धांतावर चालते.

वॉशिंग्टन. अमेरिकेने चीनवर मोठी आणि धडक कारवाई करत डझनभर चिनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. यात चीनची टॉप चिपमेकर कंपनी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इंटरनॅशनल कॉर्प (एसएमआयसी) आणि चिनी ड्रोन निर्मिती कंपनी एचजेड डीजेआय टेक्नॉलॉजी लि. चाही समावेश आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी चीनविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने डझनभर चिनी कंपन्यांना व्यापाराच्या काळ्या यादीत टाकले आहे, असे बोलले जात आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने या निर्णयाला दुजोरा दिला आहे. एसएमआयसी चीनच्या सैन्य-नागरी संचालन सिद्धांतावर चालते. औद्योगिक परिसरात एसएमआयसी आणि काही गुप्त कंपन्यांमध्ये वाद सुरू असल्याचे पुरावे मिळाले आहे. यामुळे हे पाऊल उचलले गेले आहे. जगातील सर्वात मोठी ड्रोन निर्माता कंपनी डीजेआयलाही काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

पाकिस्तानसह तुर्कीलाही दिला होता झटका !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. मात्र, जाता-जाता ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांनी भारताशी असलेली मैत्री तर राखलीच, सोबतच पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा झटका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘नाटो’मध्ये सहभागी असलेल्या तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयम एर्डोगान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे तुर्कीच्या अधिकारांवर करण्यात आलेला हल्लाच आहे, अशा शब्दात सेरेप तैयम एर्डोगान यांनी अमेरिकेच्या निर्णयावर टीका केली आहे. दरम्यान तुर्की हा सध्या असा एकमेव देश आहे जो पाकिस्तानशी जास्त जवळीक साधून आहे.