dragon man skull

उत्क्रांतीच्या(Evolution) टप्प्यातले निअँडरथलसारखे मानव आपल्याला माहिती आहेत. नव्याने सापडलेली ही कवटीदेखील (Skull Found In China) निअँडरथलसारख्या आधुनिक मानवांच्या नातलगांची असू शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

    पेयचिंग : चीनमध्ये उत्खननादरम्यान एक मानवी कवटी (Skull Found In China) सापडली आहे. या कवटीच्या माध्यमातून मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांबद्दल( Stages OF Man`s Evolution) माहिती मिळण्याची शक्यता आहे. ही कवटी ज्या मानवाची आहे, त्याला होमो लोंगी किंवा ड्रॅगन मॅन (Dragon Man) असं नाव देण्यात आलं आहे. उत्क्रांतीच्या टप्प्यातले निअँडरथलसारखे काही मानव आपल्याला माहिती आहेत. नव्याने सापडलेली ही कवटीदेखील निअँडरथलसारख्या आधुनिक मानवांच्या नातलगांची असू शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता सापडलेल्या कवटीचा शोध ८५ वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये या कवटीचा शोध घेतला गेला.

    लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममधले प्रमुख संशोधक प्रा. ख्रिस स्ट्रिंगर यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की हा गेल्या ५० वर्षांतला सर्वांत मोठा शोध आहे. हार्बिन प्रांतातल्या सॉन्गुआ नदीवर पूल बांधणार्‍या चिनी कामगारांना ही कवटी १९३३ मध्ये सापडली होती, असं मानलं जात आहे. ही कवटी जपानी लोकांच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी ती एका विहिरीत लपविली गेली होती. पुन्हा २०१८ मध्ये या कवटीचा शोध घेण्यात आला. ही कवटी लपवणाऱ्या व्यक्तीने मृत्युपूर्वी त्याच्या नातवाला याबद्दल सांगितलं होतं.

    चीनच्या जिओ युनिव्हर्सिटीमधले प्राध्यापक किआंग जी यांनी ही कवटी १.४६ लाख वर्षं जुनी असू शकते, असा अंदाज जिओकेमिकल तंत्रज्ञानाच्या मदतीने वर्तवला आहे. या कवटीची काही वैशिष्ट्यं जुनीच होती, तर काही नव्याने आढळली होती. ही कवटी होमो सेपियन्सशी (Homo sapiens) मिळतीजुळती असल्याचं आढळलंय. तसंच आधुनिक मानवांच्या कवटीच्या तुलनेत ही कवटी आकाराने खूप मोठी आहे. ही कवटी नाक रुंद असलेल्या ५० वर्ष वयाच्या पुरुषाची असावी, असं संशोधकांना वाटतं आहे. या व्यक्तीचं शरीर खूप मोठं असेल आणि त्याला हिवाळ्यात कोणत्याही भागात गेल्यास त्रास होत नसेल, असा आडाखा बांधण्यात आला आहे.

    एका दिवसापूर्वी इस्रायलमधूनही (Israel) अशीच एक बातमी आली होती. तिथल्या नेशेर रामला भागातल्या उत्खननात एक कवटी आढळली असून, ती वेगळ्या प्रकारच्या होमो मानवातल्या शेवटच्या व्यक्तीची असू शकते. या प्रकारचे लोक जवळपास ४,२०,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात होते, असं मानलं जात आहे.