ऑस्ट्रेलिया विरुद्ध फेसबुक प्रकरणातील तिढा सुटला?

हे प्रकरण इतकं विकोपाला गेलं होतं की, फेसबुकने ऑस्ट्रेलियामधील आपले पेजही बंद केले होते. पेजच बंद केल्याने ऑस्ट्रेलियामधील युजर्सना फेसबुकच्या माध्यमातून न्यूज पोस्ट बघता किंवा शेअरही करता येत नव्हत्या.

    मेलबर्न : बातम्यांसाठी शुल्क आकारणी प्रकरणी आपल्या नव्या कायद्यात सुधारणा करण्याची तयारी ऑस्ट्रेलिया सरकारने दर्शवली आहे. त्यानंतर अखेर फेसबुकनेही नरमाईची भूमिका घेतली आहे. प्रस्तावित नवीन कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. या मीडिया लॉवरुन फेसबुकचा ऑस्ट्रेलिया सरकारशी संघर्ष सुरू आहे.

    ऑस्ट्रेलिया सरकारने फेसबुक आणि गुगलकडे ऑस्ट्रेलियातील बातम्यांसाठी शुल्क आकारण्याच्या नवा कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडल्यामुळे फेसबुक आता ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रे दाखविण्यास सुरूवात करेल, अशी माहिती कोषाध्यक्ष जोश फ्रायडनबर्ग यांनी मंगळवारी दिली.

    हे प्रकरण इतकं विकोपाला गेलं होतं की, फेसबुकने ऑस्ट्रेलियामधील आपले पेजही बंद केले होते. पेजच बंद केल्याने ऑस्ट्रेलियामधील युजर्सना फेसबुकच्या माध्यमातून न्यूज पोस्ट बघता किंवा शेअरही करता येत नव्हत्या.

    फेसबुकच्या या निर्णयाचा फटका हवामान विभाग, आरोग्य विभाग आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना बसला होता. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या युजर्ससोबतच ऑस्ट्रेलियाबाहेर असलेल्यांनाही फेसबुकवर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच बातम्या वाचता येत नव्हत्या.

    “आम्हाला खात्री आहे की ऑस्ट्रेलियन सरकारने बर्‍याच बदलांवर सहमती दर्शविली आहे आणि आम्ही हमी देतो की आम्हाला त्यांच्याकडून मिळणाऱ्या मूल्यांच्या तुलनेत प्रकाशकांना दिले जाणारे मूल्य याची जाण ठेवू”, अशी माहिती फेसबुकने दिली आहे.