पंजशीरमध्ये तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्स यांच्यात पुन्हा एकदा धुमश्चक्री

अहमद मसूदच्या नेतृत्वाखालील नॉर्दर्न अलायन्सचे सैनिक तालिबानशी लढा देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी तालिबानने पंजशीरच्या चिक्रीनव जिल्ह्यावर हल्ला केला. नॉर्दर्न अलायन्सने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

    काबूल : अफगाणिस्तानमध्ये पंजशीर व्हॅली वगळता संपूर्ण देश आता तालिबानच्या ताब्यात आहे. तसेच पंजशीरमध्ये तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्स यांच्यात पुन्हा एकदा धुमश्चक्री झाल्याची पाहायला मिळाली आहे. अहमद मसूदच्या नेतृत्वाखालील नॉर्दर्न अलायन्सचे सैनिक तालिबानशी लढा देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी तालिबानने पंजशीरच्या चिक्रीनव जिल्ह्यावर हल्ला केला. नॉर्दर्न अलायन्सने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

    या चकमकीत आणखी १३ तालिबानी लढाऊ ठार झाले आहेत. त्याचबरोबर बंडखोरांनी तालिबानचा एक टँकरही नष्ट केला आहे. नॉर्दन अलायन्सने केलेल्या दाव्यानुसार, काल रात्री खवाकमध्ये हल्ला करण्यासाठी आलेले सुमारे ३५० तालिबानी लढाऊ मारले गेले आहेत. नॉर्दर्न अलायन्सने ट्विटरवर केलेल्या दाव्यानुसार, ४० हून अधिक तालिबान लढाऊंनाही पकडण्यात आले आहे.

    तालिबानी लढाऊंनी मंगळवारी रात्री पंजशीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तालिबानने एक पूल उडवून नॉर्दर्न अलायन्सच्या सैनिकांसाठी सुटण्याचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह म्हणाले की, त्यांचा विरोध सर्व अफगाण नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आहे.