अखेर कब्जा मिळवला! आजवर अजिंक्य असलेले पंजशीर तालिबानने जिंकले; युद्धविरामाची घोषणा

तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद्दीनने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पंजशीर प्रांत वगळता संपूर्ण अफगाणिस्तावर 16 ऑगस्टपासून तालिबानने ताबा मिळवला. त्यानंतर नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये तालिबानचे युद्ध सुरू होते. रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर शत्रूच्या ताब्यातील पंजशीरवर आम्ही पूर्णपणे ताबा मिळवला आहे. त्यामुळे देश युद्धमुक्त झाला आहे. पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सच्या दबावाखाली असणाऱ्या स्थानिकांची आम्ही सुटका केली आहे. प्रत्येक प्रांताला शांतता पुरविण्याठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे देशातील नागरिक शांततेत, समृद्ध जीवन जगतील, असा विश्वासही तालिबानने व्यक्त केला आहे.

  काबुल : आजवर अजिंक्य असलेल्या पंजशीर प्रांतावर तालिबानने कब्जा केला असून, नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांसोबत सुरू असलेले तालिबानचे युद्ध आता संपले आहे. त्यामुळे तालिबान आता युद्धमुक्त झाल्याची घोषणा तालिबानकडून करण्यात आली आहे.

  तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद्दीनने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पंजशीर प्रांत वगळता संपूर्ण अफगाणिस्तावर 16 ऑगस्टपासून तालिबानने ताबा मिळवला. त्यानंतर नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये तालिबानचे युद्ध सुरू होते. रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर शत्रूच्या ताब्यातील पंजशीरवर आम्ही पूर्णपणे ताबा मिळवला आहे. त्यामुळे देश युद्धमुक्त झाला आहे. पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सच्या दबावाखाली असणाऱ्या स्थानिकांची आम्ही सुटका केली आहे. प्रत्येक प्रांताला शांतता पुरविण्याठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे देशातील नागरिक शांततेत, समृद्ध जीवन जगतील, असा विश्वासही तालिबानने व्यक्त केला आहे.

  बंड करणाऱ्यास सोडणार नाही

  तालिबानने पंजशीर खोऱ्यावर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातील त्यांच्या सत्तेविरोधात बंड करणाऱ्यांना थेट आणि कठोर शब्दात इशारा दिला आहे. आपल्या सत्तेविरोधात कुणी बंड केलेच तर त्याला सोडले जाणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे. याच बरोबर, अफगाणिस्तानमध्ये सध्या केवळ अंतरिम सरकारच स्थापन होईल. यानंतर बदल केले जाऊ शकतात, असेही तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. खरे तर तालिबानच्या वेगवेगळ्या गटांत सत्ता वाटपावरून मतभेद आहेत. यामुळेच कदाचीत अंतरिम सरकार स्थापन केले जात आहे. यामुळे, कायमस्वरूपी सरकार स्थापनेसाठीही वेळ दिला जाऊ शकेल.

  अमरुल्ला सालेहचे पलायन

  पंजशीर खोऱ्यात बंडखोरांचे नेतृत्व करणारे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी देश सोडून पलायन केले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की अमरुल्ला सालेह ताजिकिस्तानला पळून गेले आहेत. तत्पूर्वी, काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांत सांगण्यात आले आहे, की सालेह एका गुप्त ठिकाणावरून लढ्याचे नेतृत्व करत आहेत. याशिवाय, पंजशीरचे आणखी एक नेते अहमद मसूद यांनी ट्विट करून सांगितले आहे, की ते सुरक्षित आहेत.

  ‘मित्र’ देशांना सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी निमंत्रण

  अफगाणिस्तानच्या सर्व प्रांतांवर कब्जा असल्याचा दावा केल्यानंतर तालिबानने सरकार स्थापनेच्या कार्यक्रमासाठी 6 देशांना निमंत्रण पाठवले आहे. त्यामध्ये चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतार आणि तुर्कस्तान या देशांचा समावेश आहे. तालिबानने यासाठी भारताला अद्याप संपर्क केलेला नाही. तालिबानच्या निमंत्रणावरून हे स्पष्ट झाले आहे की, या 6 देशांच्या सरकारांनी यापूर्वीच तालिबानी संघटनेशी संपर्क साधला आहे. चीन, रशिया, तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांनी पूर्वीप्रमाणेच आपल्या दूतावासात काम करणे सुरूच ठेवले आहे. दरम्यान, एक दिवस आधीच तालिबानचे प्रवक्ते झाबीला मुजाहिद यांनी पुढील आठवड्यापर्यंत सरकार स्थापनेला स्थगिती जाहीर केली होती.

  अखुंदजादा जिवंत असल्याचा दावा

  तालिबानने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केला आहे की त्यांचे सर्वोच्च नेते हिब्तुल्लाह अखुंदजादा अजून जिवंत आहेत आणि काही दिवसातच सार्वजनिकरित्या दिसून येतील. तालिबानने अफगाणिस्तान काबीज केल्यांनंतर प्रश्न उपस्थित केला जात होता की, त्यांचे सर्वोच्च नेते कुठे आहेत आणि सार्वजनिकरित्या समोर का येत नाहीत? मे 2016 मध्ये अखुंदजादा तालिबानचे सर्वोच्च कमांडर बनले होते. त्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. ते बऱ्याच वर्षांपासून अफगाणिस्तानात रहातात. तालिबानचे सुप्रीम कमांडर या नात्याने अखुंदजादा राजकीय, लष्करी आणि धार्मिक विषयांचे प्रमुख आहेत.