अखेर हटवलं! महाकाय ‘एव्हर गिव्हन’ जहाज काढण्यात यश ; सुएझ कालव्याने घेतला मोकळा श्वास!

सुएझ कालवा प्राधिकरणाने शनिवारी जहाज बाजूला करण्यासाठी दोनदा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं होतं. जास्त भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन शनिवारी प्रयत्न केले गेले. जपानच्या शोई कायसन केके कंपनीने १० बोटी हे जहाज बाजूला काढण्यासाठी पाठवल्या होत्या. शोई कायसेन कंपनीचे अध्यक्ष युकिटो हिगाकी यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती.

    इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकून पडलेलं एव्हर गिव्हन मालवाहू जहाज बाहेर काढण्यात पाच दिवसांनंतर यश आलं आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे जहाज गाळात रुतल्यामुळे युरोप आणि आशियातील व्यापार ठप्प झाला होता. या मार्गावरील समुद्री वाहतूक करणारे शेकडो जहाजांची रांगच लागली. यामुळे दररोज ७५०० कोटी रुपयांच्या व्यापाराचं नुकसान झालं. मात्र अखेर हे रुतलेलं जहाज बाहेर काढण्यात यश आलं आहे.

     

    वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, जवळपास आठवडाभर अडकलेलं हे विशाल जहाज आता पाण्यावर तरंगू लागलं आहे, अशी माहिती इंचकॅम्प शिपिंग सर्व्हिसेसने दिली आहे. हे जहाज आता चालू करण्याच्या स्थितीत आणण्याचं काम सुरु आहे.जागतिक समुद्र सेवा देणारी संस्था इंचकॅम्पने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.३० वाजता जहाज पुन्हा तरंगू लागलं. आता या जहाजावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. जहाजांना ट्रॅक करणारी संस्था वेसलफायंडरनेही आपल्या वेबसाईटवर या जहाजाचं स्टेटस अपडेट करुन, जहाज आता आपल्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे.

    सुएझ कालवा प्राधिकरणाने शनिवारी जहाज बाजूला करण्यासाठी दोनदा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं होतं. जास्त भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन शनिवारी प्रयत्न केले गेले. जपानच्या शोई कायसन केके कंपनीने १० बोटी हे जहाज बाजूला काढण्यासाठी पाठवल्या होत्या. शोई कायसेन कंपनीचे अध्यक्ष युकिटो हिगाकी यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. हे जहाज पुन्हा तरंगू शकणार नसेल तर त्याचे कंटेनर्स वेगळे करावे लागणार आहेत, पण ते खूप अवघड आहे, असंही हिगाकी यांनी स्पष्ट केलं आहे. आता हे जहाज बाहेर काढल्यानंतर त्याच्या सुरक्षेची चाचपणी करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.