धनुष्यबाणाने पाच जणांची भर रस्त्यात हत्या; नार्वेच्या रस्त्यावर थरार

    ओस्लो (Oslo). नॉर्वेमध्ये (Norway) एका व्यक्तीने धनुष्यबाणाने वार करून पाच जणांची हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नॉर्वेमधील काँग्सबर्ग (Kangsberg in Norway) शहरात ही घटना घडली. एका व्यक्तीने धनुष्यबाण (bow) घेऊन गर्दीच्या ठिकाणी अचानक हल्ला केला. त्याने सोडलेल्या बाणांमुळे पाच जणांचा बळी गेला. तर, अनेक लोक जखमी झाले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत संशयित हल्लेखोराला (the suspected assailant) ताब्यात घेतले असल्याची माहिती कोंग्सबर्ग शहर पोलिस दलाने दिली.

    संशयित हल्लेखोराने या गर्दीच्या भागात पायी चाललेल्या लोकांवर धनुष्यबाणाच्या सहायाने बाण सोडून हा हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने भांबावलेल्या लोकांची जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाली. काही लोक जागीच मरण पावले तर काही लोक जखमी झाले. हा आरडाओरडा, गोंधळ सुरू असताना हल्लेखोर इथून दुसऱ्या भागात पळाला.

    दरम्यान, पोलिसांना या हल्ल्याची खबर मिळाल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित हल्लेखोराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली आणि अखेर त्याला घटनास्थळापासून 25 किमी अंतरावरील ड्राईमन भागात पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी त्याने पोलिसांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर आणि बॉम्ब शोधक पथकेही तैनात केली होती.