फ्रान्समध्ये सर्वांची कोरोना चाचणी होणार मोफत, पैसे दिल्यास परतही मिळणार

फ्रान्समध्ये नागरिकांनी कोरोना विषाणूची चाचणी केल्यास त्यांना सरकारकडून पैसे परत मिळणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही त्यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारली आहे.

पॅरिस : फ्रान्समधील नागरिकांसाठी कोरोना चाचणी आता मोफत होणार आहे. आरोग्यमंत्री ओलिवर वेरन यांनी रविवारी याबाबतची घोषणा केली. फ्रान्समधील कोणत्याही नागरिकाने कोरोना विषाणूची चाचणी केल्यास, त्याला त्या चाचणीचे पैसे परत करण्यात येतील. मी शनिवारी एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आजापासून कोणीही PCR चाचणी केल्यास त्याला याचे पैसे परत मिळतील. यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी किंवा सबळ कारणाची आवश्यकता असणार नाही. लक्षणे नसलेल्यांनाही हा नियम लागू होणार असल्याची माहिती त्यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.

फ्रान्समध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून याचा आणखी प्रादुर्भाव किती वाढणार याविषयी सांगण्यास नकार दिला. त्यांच्या मते, याबाबत आत्ताच सांगणं योग्य ठरणार नाही. गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वेगाने वाढत होती तर सलग १३ आठवड्यांत हीच रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र होते. ही बाब दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी तरुणांना सावध रहा आणि हा विषाणू आपलं काहीही बिघडवणार नाही या भ्रमात राहू नका असा सल्ला दिला आहे.

फ्रान्समध्ये रुग्णांची संख्या २.१७ लाखांहून अधिक

कोविड-१९ च्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत फ्रान्समध्ये २,१७,८०१ रुग्ण आढळले आहेत. जगातील रुग्णसंख्येचा विचार करता रविवारी कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या एकूण संख्येने १.६ कोटींचा टप्पा यापूर्वीच पार केला आहे. जगात या आजाराने ६,४४,००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत संक्रमण आणि मृतांची संख्या प्रथम क्रमांकावर असून ती अनुक्रमे ४१,७८,०२७ आणि १,४६,४६० आहे. ब्राझीलमध्ये २३,९४,५१३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ८६,४४९ जण दगावल्याने तो दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.

भारतात आतापर्यंत ३० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर (१३,८५,६३५) आहे. यानंतर रशिया (८,०५,३३२), दक्षिण आफ्रिका (४३४,२००) यांचा क्रमांक लागतो. ज्या देशात आजवर कोरोनामुळे १०,००० हून अधिक जण दगावले आहेत त्यात ब्रिटन(४५,८२३), मेक्सिको (४२,६४५), इटली(३५,१०२), भारत (३२,०६०) फ्रान्स (३०,१९५), स्पेन (२८,४३२), पेरू (१७,८४३), ईराण (१५,४८४) आणि रशिया (१३,१७२) यांचा समावेश आहे.