अबब! स्टीव्ह जॉब्स यांच्या ‘या’ अर्जाची अडीच कोटींना विक्री

जॉब्स यांच्या या नोकरीच्या अर्जाचा चौथ्यांदा लिलाव करण्यात आला आहे. याआधी २०१७ मध्ये १८,७५० डॉलर्स, २०१८मध्ये १,७४,७५७ डॉलर्स आणि मार्चमध्ये २,२२,४०० डॉलर्समध्ये त्याचा लिलाव करण्यात आला होता. यंदाचा लिलाव मात्र काहीसा वेगळा होता. अर्जाचे फिजिकल आणि डिजिटल व्हर्जन सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले होते.

    मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असं आपण अनेकदा ऐकलं आहे. आता याची प्रचिती पुन्हा आली आहे. अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी वापरलेल्या वस्तूंचा सध्या कोटय़वधी रुपयांना लिलाव होत आहे. नुकताच स्टीव्ह जॉब यांनी १९७३ साली म्हणजेच वयाच्या १८व्या वर्षी नोकरीसाठी केलेल्या अर्जाचा लिलाव अडीच कोटी रुपयांना झाला आहे.

    वयाच्या १८ व्या वर्षी जॉब मिळविण्यासाठी जॉब्स यांनी नोकरीचा अर्ज आपल्या हाताने लिहिला होता. विशेष म्हणजे ज्या अर्जाचा लिलाव झाला तो एकमेव अर्जच आपल्या आयुष्यात स्टीव्ह जॉब्स यांनी केला होता.जॉब्स यांनी या अर्जात नाव, पत्ता, फोन भाषा, ड्रायव्हिंग लायसन्स आणि स्पेशल एबिलिटीजची माहिती दिली होती. अर्ज चांगल्या स्थितीत असल्याचादेखील लिलावात उल्लेख करण्यात आला होता.

    जॉब्स यांच्या या नोकरीच्या अर्जाचा चौथ्यांदा लिलाव करण्यात आला आहे. याआधी २०१७ मध्ये १८,७५० डॉलर्स, २०१८मध्ये १,७४,७५७ डॉलर्स आणि मार्चमध्ये २,२२,४०० डॉलर्समध्ये त्याचा लिलाव करण्यात आला होता. यंदाचा लिलाव मात्र काहीसा वेगळा होता. अर्जाचे फिजिकल आणि डिजिटल व्हर्जन सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. याचे कारण म्हणजे त्यांच्या फिजिकल अर्जाला जास्त किंमत मिळतेय की डिजिटल हे आयोजकांना बघायचे होते. लोकांना स्टीव्ह जॉब्स यांनी स्वतः लिहिलेल्या अर्जामध्ये जास्त रस असल्याचे पाहायला मिळाले.