महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांचा तुरुंगवास, केला हा गुन्हा, दक्षिण अफ्रिकेच्या न्यायालयाचा निर्णय

आशिष लता या महात्मा गांधींची नात इला गांधी यांची मुलगी. इला हा दक्षिण अफ्रिकेत ९ वर्ष खासदार होत्या. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा नुकताच निकाल लागला. त्यात इला यांची कन्या आशिष लता हिला न्यायालयानं शिक्षा सुनावली. दक्षिण अफ्रिकेतील एका व्यापाऱ्यानं आशिष लताविरुद्ध ६ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

    भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पणतीला (नातीच्या मुलीला) दक्षिण अफ्रिकेच्या न्यायालयाने ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. आशिष लता रामगोबिन असं त्यांचं नाव असून फसवणुकीच्या एका प्रकरणात तिला ही शिक्षा सुनावण्यात आलीय.

    आशिष लता या महात्मा गांधींची नात इला गांधी यांची मुलगी. इला हा दक्षिण अफ्रिकेत ९ वर्ष खासदार होत्या. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा नुकताच निकाल लागला. त्यात इला यांची कन्या आशिष लता हिला न्यायालयानं शिक्षा सुनावली. दक्षिण अफ्रिकेतील एका व्यापाऱ्यानं आशिष लताविरुद्ध ६ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

    आशिष लता ही एक एनजीओ चालवायची. पार्टिसिपेटिव्ह डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह असं या एनजीओचं नाव. त्यांचे अनेक नातेवाईक या संस्थेत कार्यरत होते. या कामासाठी आशिष लताला भारत आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही देशांनी सन्मानीतही केलंय. पर्यावरण, सामाजिक आणि राजकीय सुधारणांसाठी ही संस्था काम करते.

    ऑक्टोबर २०१५ मध्ये लतावर दक्षिण अफ्रिकेतील उद्योगपती एस. आर. महाराज यांची ८.३ लाख डॉलर म्हणजेच सुमारे ६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला. भारतातून लिनेनचे ३ कंटेनर दक्षिण अफ्रिकेतील हॉस्पिटल ग्रुप नेट केअरला डिलिव्हर करण्यासाठी लताने या उद्योगपतींकडे पैशांची मागणी केली. लता यांनी त्यासाठीची कागदपत्रंही या उद्योगपतींना दाखवली. लता यांची पार्श्वभूमी बघून त्यांनी मदत केली. मात्र नंतर ती कागदपत्रं बोगस असल्याचं सिद्ध झालं.