थंड हवामान असलेल्या कॅनडामध्ये लोक आता उष्णतेने बेजार – ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले तापमान, शेकडो लोकांचा मृत्यू

कॅनडातल्या (Canada) ब्रिटिश कोलंबियामधल्या लिटन (Litton) या गावात गेल्या मंगळवारी तब्बल 49.6 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं. त्यामुळे अनेक जंगलांमध्ये आगीही लागल्या.

  कॅनडा : कॅनडा हा खरंतर थंड हवामान असलेला देश. मात्र कॅनडा सध्या ते चर्चेत आहे उष्णतेच्या भयंकर लाटेसाठी. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे अवघ्या काही दिवसांत तिथे शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडाच्या प्रशासकीय कार्यालयांमधले फोन मदतीच्या मागणीसाठी सारखे वाजत आहेत. कारण तिथल्या तापमानाचा पारा तब्बल पन्नास अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आणखीही अनेकांचे प्राण उष्णतेच्या लाटेमुळे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

  कॅनडातल्या (Canada) ब्रिटिश कोलंबियामधल्या लिटन (Litton) या गावात गेल्या मंगळवारी तब्बल 49.6 अंश सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं. त्यामुळे अनेक जंगलांमध्ये आगीही लागल्या. या आगींमुळे गावाचा बराचसा भाग जळून खाक झाला आहे. गेल्या रविवारच्या आधी कॅनडा देशात कधीच तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर गेलं नव्हतं. 45 अंश सेल्सिअस तापमान झालं, की देशातलं कामकाज अक्षरशः ठप्प व्हायचं; रस्ते ओस पडायचे.

  गेल्या आठवड्यात तिथलं तापमान इतकं वाढू लागलं आहे, की तिथल्या नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. वास्तविक तिथलं तापमान थंड असल्यामुळे बहुतांश घरांमध्ये एअर कंडिशनरची (Air Conditioners) आवश्यकता भासत नाही. आताच्या परिस्थितीत मात्र एसी नसलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचे उष्णतेमुळे हाल होत आहेत.

  अत्यंत कडक उन्हाळ्यापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कॅनडा सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत आहे. तिथल्या स्टेडियम्समध्ये एअर कंडिशनर लावून कुलिंगची व्यवस्था करण्यात आली. ही स्टेडियम्स (Stadiums) लोकांसाठी खुली करून देण्यात आली आहेत. तिथे येऊन लोक काम करू शकतात किंवा अगदी झोपूही शकतात. थोडक्यात सांगायचं झालं, तर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी एखादी छावणी उभारावी, तसंच हे आहे.

  अनेक मोठ्या शहरांमध्ये मिस्टिंग स्टेशन्स (Misting Stations) तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी थंड पाण्याचे फवारे सातत्याने उडवले जात असतात. त्यामुळे निदान थोड्या वेळासाठी तरी उष्णतेपासून सुटका होते आणि थोडा दिलासा मिळतो. ही उष्णतेची लाट इतकी भयंकर आहे, की अशा मिस्टिंग स्टेशन्सवर लोक कोरोना संसर्गाची भीती सोडून एकत्र होत आहेत, गर्दी करत आहेत.

  शहरी भागांमध्ये हिरवळ, झाडं कमी आहेत. अशा भागांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा वितळू लागल्या आहेत, रस्त्यांवरचं डांबरं वितळल्यामुळे खड्डे पडत आहेत. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम होत आहे.

  या प्रचंड उष्णतेला ‘हीट डोम’ (Heat Dome) कारणीभूत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ही हवामानाची अशी स्थिती असते, की जिथे तापमान वेगाने वाढतं. महासागरांचं (Oceans) तापमान वाढतं, त्या वेळी ‘हीट डोम’ची स्थिती उद्भवते. या प्रक्रियेला संवहन म्हणतात. त्यात गरम हवा वर जात असताना समुद्राच्या तळापासून वरपर्यंतच्या पाण्याला गरम करत जाते. वरच्या दिशेला जाताना गरम हवा एक वर्तुळ तयार करते आणि पुढे जाते. यालाच हीट डोम असं म्हणतात.

  हीट डोम ही एक असामान्य स्थिती असते आणि त्या परिस्थितीशी दोन हात करणं सोपं नाही. त्यामुळेच कॅनडात या उष्णतेच्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. उष्ण हवामानाचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे, तर पशू-पक्षी आणि शेतीवरही होतो. जंगलांमध्ये लागलेल्या आगींनाही हीट डोमच कारणीभूत आहे. या आगींनी सध्या कॅनडात थैमान घातलं आहे. शेतीचंही मोठं नुकसान होत आहे; मात्र सध्या बाकी कोणत्याही नुकसानापेक्षा जीवितहानी कमीत कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.