जर्मनीत हाहाकार ; भीषण पुरामुळे ८१ ठार, १०० हून अधिक बेपत्ता

जर्मनीत आलेल्या पुराच्या वृत्तामुळे चिंतेत असल्याचे अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी म्हटले आहे. पुरामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांसाठी मर्केल यांनी शोक व्यक्त केला.

    बर्लिन: जर्मनीत पहिल्यांदा भीषण पूर आला आहे. यापुरामुळे सर्वत्र हाहाकार झाला आहे. मुसळधार पाऊस आणि आलेल्या पुरामुळे येथे जवळपास ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० हून अधिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. पुराच्या पाण्यामुळे रस्त्यावरील वाहने वाहून गेली आहेत. तर, काही इमारती कोसळल्या आहेत. देशातील अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

    फोन इंटरनेट सुविधा ठप्प
    याबाबत पश्चिम काउंटी युस्किरचेन भागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की मुसळधार पाऊस आणि पुरामुळे इथले जनजवीन विस्कळीत झाले आहे.या भागात आठजणांचा मृत्यू झाला आहे. तर फोन आणि इंटरनेट सुविधा ठप्प झाल्याने मदत आणि बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. कोबलेंज शहरातील आर्हवायलर काउंटी येथे चार जणांचा पुराच्या पाण्यात मृत्यू झाला असून, जवळपास ५० जण घरांच्या छतांवर अडकले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. पूर आणि भूस्खलन झाल्याने या भागांमध्ये किती नुकसान झाले याची ठोस माहिती उपलब्ध नाही. पश्चिम आणि मध्य जर्मनीसह शेजारील देशांमध्येही या पुराचा आणि पावसाचा फटका बसला आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. जर्मन लष्कराने आपले २०० जवान मदत कार्यासाठी पाठवले आहेत.

    जर्मनीत आलेल्या पुराच्या वृत्तामुळे चिंतेत असल्याचे अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांनी म्हटले आहे. पुरामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांसाठी मर्केल यांनी शोक व्यक्त केला.