Facebook ची न्यूज सर्व्हिस ऑस्ट्रेलियात बंद; आपत्कालीन सेवांवरही परिणाम

ऑस्ट्रेलियामधील सरकार फेसबुक आणि गुगलवरील बातम्यांबात सध्या एक कायदा करण्याच्या तयारीत आहे. बातम्यांच्या बदल्यात फेसबुक आणि गुगलकडून पैसे आकारण्यासंबंधीचा हा कायदा (मीडिया लॉ) आहे. ऑस्ट्रेलियात हा कायदा पारित झाल्यास फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यमांना पैसे द्यावे लागणार आहेत.

  मेलबर्न : ऑस्ट्रेलियामध्ये बातम्या दाखविण्यासाठी पैसे देण्याच्या कायद्याविरोधात फेसबुकने सर्व वेबसाईट्सवर बातमी पोस्ट करण्यास बंदी घातली आहे. फेसबुकने घातलेल्या या बंदीमुळे हवामान विभाग, आरोग्य विभाग आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील विरोधी पक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले आहे. इतकेच नव्हे तर फेसबुकने ऑस्ट्रेलियामध्ये स्वतःचं पेजही ब्लॉक केलं आहे. फेसबुकच्या या बंदीमुळे आपत्कालीन सेवांवर वाईट परिणाम झाल्याचे दिसत आहे.

  फेसबुकने १७ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियात बातम्यांची सेवा बंद करत असल्याची घोषणा केली होती. फेबसुकच्या या बंदीमुळे आता ऑस्ट्रेलियातील युजर्सना फेसबुक अ‍ॅपच्या माध्यमातून न्यूज फीडवर बातम्या पाहता येत नाहीत. दरम्यान त्याचा फटका काही इमरजन्सी अलर्ट देणार्‍या ऑस्ट्रेलियन पेजेसलाही बसला आहे. त्यामध्ये कोव्हिड १९ अपडेट्स, बुश फायर अर्थात वणवा किंवा सायक्लोनचे अपडेट्सही युजर्सना मिळणार नाहीत. सध्या आरोग्य विभाग आणि हवामान खात्याशी निगडीत काही पेजेस बंद करण्यात आली आहेत.

  असं आहे नेमकं प्रकरण

  ऑस्ट्रेलियामधील सरकार फेसबुक आणि गुगलवरील बातम्यांबात सध्या एक कायदा करण्याच्या तयारीत आहे. बातम्यांच्या बदल्यात फेसबुक आणि गुगलकडून पैसे आकारण्यासंबंधीचा हा कायदा (मीडिया लॉ) आहे. ऑस्ट्रेलियात हा कायदा पारित झाल्यास फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यमांना पैसे द्यावे लागणार आहेत. सध्या या मीडिया लॉ वरून फेसबुक आणि ऑस्ट्रेलिया सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू आहे.

  दरम्यान, कायदा पारित करण्यापूर्वीच फेसबुकने युजर्सच्या न्यूज फीडवर बातम्या दाखवणे बंद केले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या बाहेर असलेल्या युजर्सनाही फेसबुकवर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही माध्यमाच्या बातम्या वाचता येत नाहीत. आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जाणार असल्याचे गुगल आणि फेसबुकचे म्हणणे आहे. दरम्यान, फेसबुकने घातलेली ही बंदी फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचे ऑस्ट्रेलियन सरकारने म्हटलं आहे.

  गुगल आणि फेसबुकची धमकी

  ऑस्ट्रेलियामध्ये ऑनलाइन जाहिरातींमध्ये ८१ टक्के भागीदारी असणार्‍या गुगल आणि फेसबुकने या विधेयकाचा निषेध केला आहे. हे बिल सादर केल्यास ऑस्ट्रेलियामधील त्यांचे (गुगल) सर्च इंजिन बंद करण्यात येईल, अशी गुगलने धमकी दिली आहे. तर फेसबुकने धमकी दिली होती की, जर ऑस्ट्रेलियन प्रकाशकांना पैसे देण्याची आमच्यावर सक्ती केल्यास आम्ही बातम्या शेअर करण्यावर बंदी घालू. जशी धमकी दिली होती, फेसबुकही तसंच वागत आहे.

  फेसबुकच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल : ऑस्ट्रेलियन सरकारचा निर्वाळा

  संबंधित कायदा पारित करण्यावर ऑस्ट्रेलियन सरकार ठाम आहे. बुधवारी (१७ फेब्रुवारी) संसदेच्या कनिष्ठ सभागृहात या कायद्याला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच हा कायदा पारित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, फेसबुकने बातम्यांवर घातलेल्या बंदीबाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचे दूरसंचार मंत्री पॉल फ्लेचर म्हणाले की, अशा प्रकारची कारवाई म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला किती हानी पोहोचू शकते, याचा फेसबुकनं काळजीपूर्वक विचार करायला हवा,” दरम्यान, फेसबुकने गुरुवारी सकाळपासून ऑस्ट्रेलियन न्यूज वेबसाईट्सना फेसबुकवर बातम्या पोस्ट करण्यापासून रोखलं आहे. इतकेच नाही तर फेसबुकने ऑस्ट्रेलियन वापरकर्त्यांना (युजर्सना) देशांतर्गत किंवा परदेशी कुठल्याही न्यूज वेबसाइटच्या बातम्या उघडण्यास बंदी घातली आहे. सेनेटमध्ये आलेल्या कायद्याच्या विरोधात फेसबुकने हे पाऊल उचललं असल्याचे स्पष्टीकरण फेसबुककडून देण्यात आलं आहे.