snake

इंडोनेशिया(Indonesia) या देशामध्ये विषारी साप(poisonous snake) हा शक्तीचा स्त्रोत मानला जातो. तिथे कोब्रासारख्या विषारी सापांचं रक्तसुद्धा लोक चहासारखं पितात.

जकार्ता: भीतीमुळे माणूस सापांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो पण इंडोनेशियामध्ये(Indonesia) विषारी साप(poisonous snake) हा शक्तीचा स्त्रोत मानला जातो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण तिथे कोब्रासारख्या विषारी सापांचं रक्त(snake blood drinking in Indonesia) लोक चहासारखं पितात. साप म्हणजे निसर्गानं माणसाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असा इंडोनेशियामधील लोकांचा समज आहे. त्यामुळेच तिथल्या बाजारात असे विषारी साप दिसून येतात.

इंडोनेशियातील लोकांचं असं म्हणणं आहे की, पारंपारिक उपचार पद्धतीनुसार जंगली श्वापदं आणि झाडांच्या आधारे कोणत्याही आजारावर उपचार करणं शक्य आहे. इंडोनेशियामध्ये  गंभीर त्वचाविकार असलेल्या रुग्णाच्या अंगाला सापांच्या त्वचेचा लगदा करून लेप लावला जातो. त्वचा विकारांबरोबरच कॅन्सर, ह्रदयरोग अन्य गंभीर विकारांमध्येही सापांचा वापर या देशात केला जातो. ह्रदयरोग असलेल्यांंना तर सापाचं विष औषध म्हणून दिलं जात.

दारू पिण्याआधी सापाच्या विषापासून बनवलेलं औषध संबंधितास दिल्यास दारूचा कोणताही दुष्परिणाम संबंधितावर होत नाही, असा या देशात समज आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत सापांचं रक्त विकलं जातं. लष्करी जवानांच्या दैनंदिन आहारात कोब्राचं रक्त आणि मांसाचा समावेश असतो. हे रक्त जवानांना स्टॅमिना वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं मानलं जातं.

इंडोनेशियातील बाजारात किंग कोब्रा रेस्टॉरंटस आहेत.  या रेस्टॉरंटच्या  गोदामात कोब्रा तसेच विविध जातींचे साप ठेवलेले असतात. येथे आलेल्या ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार आपला मेन्यू निवडता येतो. त्यानंतर सापाच्या मांसाचा वापर करून तयार केलेली डिश ग्राहकांना दिली जाते. या डिशसोबत कोब्राचे (cobra) रक्तदेखील पिण्यास दिलं जातं. सापांना मारून त्यांचं रक्त काढणं तसंच त्यांच्या विविध अवयवांचा वापर करून चविष्ट डिश बनवण्यासाठी प्रशिक्षित लोकांची नेमणूक केलेली असते. तसेच इंडोनेशियात सापांपासून बनवलेली औषधं विकली जातात. ही औषधं लोशन, तेल, कॅप्सूल स्वरुपात असतात.

मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र असलेल्या इंडोनेशियामध्ये अधिकृतरित्या सापांचं पालन केलं जातं. सेमारंग, सेरंग आणि तेगल या शहरांमध्ये दर सप्ताहात मोठ्या प्रमाणात जंगलांमधून आणलेल्या सापांची विक्री केली जाते. येथील एक दुकानदार एका आठवड्यात सरासरी १०० सापांची विक्री करतो. यामध्ये विविध जातींच्या सापांचा समावेश असतो. त्यात कोब्राला सर्वाधिक पसंती असते.

साप खाण्याचा हा शौक तसा महागात देखील पडू शकतो. इंटरनॅशनल सोसायटी ऑन टॉक्सिनॉलॉजीच्या (International Society On Toxicology) अहवालानुसार दरवर्षी इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात सुमारे ११००० सापांच्या शौकिनांचा मृत्यू हा सर्पदंशामुळे होतो.